ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या! बँक अधिकारी अंकिता परब यांचे प्रतिपादन

मसुरे,दि.३१ जानेवारी(झुंजार पेडणेकर)

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विविध कौशल्यावर आधारित उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आर्थिक साक्षरता उपक्रम. सदर उपक्रम नुकताच नांदगाव मधलीवाडी, नांदगाव वाघाचीवाडी, ओटव नांदगाव या तीन शाळेतील विद्यार्थ्यां साठी
नांदगाव मधलीवाडी प्रशाला येथे आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थी जीवनामध्ये बचतीला फार महत्त्वाचे स्थान आहे. बचतीचे महत्त्व शालेय जीवनामध्ये रुजविले तर त्याचा फायदा निश्चितपणे भावी काळासाठी होऊ शकतो असे प्रतिपादन ॲक्सिस बँक डेप्युटी मॅनेजर श्रीमती अंकिता परब मॅडम यांनी यावेळी आर्थिक साक्षरता मार्गदर्शन मेळाव्यात केले. बँकिंग क्षेत्रामध्ये ऑनलाईन व्यवहार करताना विद्यार्थी पालक यांनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. माहिती तंत्रज्ञाच्या युगामध्ये ऑनलाईन फ्रॉड हे उपजीविकेचे साधन बनत चालले आहे. तेव्हा ऑनलाईन व्यवहार करताना मोबाईल वर येणारी लिंक आणि त्यावरून मागवली जाणारी माहिती याची शहानिशा नजिकच्या बँकेत जाऊन करा आणि नंतरच व्यवहार करा. पुढे त्यांनी बँकेत गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी विड्रॉल स्लीप,चेक भरणे,याविषयी विस्तृत माहिती दिली.
श्री. घाडीगावकर यांनी बँकिंग विश्वातील ऑनलाईन व्यवहार करताना फोन पे, गुगल पे, पेटीएम, वापरताना कोणती काळजी घेतली जावी तसेच ऑनलाईन पद्धतीने कसे फसविले जाते याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले. विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले.
मान्यवरांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रावणी जावकर यांनी केले. यावेळी नांदगाव मधलीवाडी प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका निकिता जठार, श्री संतोष सातोसे , मानसी मोरये, नांदगाव वाघाचीवाडी प्रशालेच्या शिक्षिका शिवानी देसाई, ओटव नांदगाव चे आनंद तांबे उपस्थित होते
श्रीम. श्रावणी जावकर मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.