सायंकाळी घोडे, उंटासह निघणार बाबांची पालखी मिरवणूक;नेरूर यांचा ट्रिकसनीयुक्त ‘व्यंकटेश पद्मावती’ या नाट्यप्रयोग होणार सांगता
कणकवली दि.३१ जानेवारी(भगवान लोके)
योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मदिन उद्या गुरुवार १ फेब्रुवारीला संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होणार आहेत. बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त गेले ४ दिवस संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या उत्सवामुळे कणकवलीनगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे. गुरुवारी सायंकाळी शहरातून भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक निघणार आहे.
१ रोजी ५.३० वा. काकड आरती, समाधीपूजा, जपानुष्ठान होईल. ८ वा. भजने, ९ वा. समाधीस्थानी लघरुद्र, ९.३० वा. वेंगुर्ले-वेतोरे येथील ह. भ. प. भाऊ नाईक यांचे जन्मोत्सवावर कीर्तन, १२ वा. परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० जन्मसोहळा, आरती १२.३० वा. आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ५ वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची शहरातून मिरवणूक निघणार आहे. यात सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदायचे वारकरी व भक्तगण सहभागी होणार असून पालखीच्या दिमतीला घोडे व उंट असणार आहेत. रात्री ८ वा. नित्य आरती, रात्री १२ वा. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा ट्रिकसनीयुक्त ‘व्यंकटेश पद्मावती’ हा प्रयोग होऊन उत्सवाची सांगता होईल. उत्सावाच्या चौथ्या दिवशी पहाटे ५.३० वा. काकड आरती, समाधीपूजा, अभिषेक हे विधी पार पडले. सकाळच्या सत्रात सर्व भक्तांच्या कल्याणार्थ परमहंस भालचंद्र महारुद्र स्वाहाकार पाडला. दुपारी भाविकांनी भालचंद्र महाराज यांची महाआरती केली. त्यानंतर असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी कलाकरांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. सायंकाळच्या सत्रात ओम भवानी दशावतार नाट्यमंडळ, राठीवडे मालवण यांचा प्रयोग झाला. हा प्रयोग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
प. पू. भालचंद्र महाराज यांच्या १२० व्या जन्मोत्सवास रविवार २८ जानेवारीला पासून भक्तमय वातावरणात प्रारंभ झाला होता. या उत्सवानिमित्त गेले चार दिवस संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आहेत. या उत्सवामुळे कणकवलीनगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे. बाबांच्या चरणी भक्तीचा ओघही वाढला आहे. या उत्सवासाठी विविध ठीकणाहून बाबांचे भक्त कणकवलीत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. याशिवाय भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी दररोज विविध फुलांची आरास केली जात आहे. त्यामुळे भालचंद्र महाराज यांचे मूर्ती व समाधीस्थळ सर्वांगसुंदर दिसत आहे. या उत्सवानिमित्त प. पू भालचंद्र महाराज संस्थान व नमो भालचंद्राय ग्रुपतर्फे दीपोत्सव स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेत नागरिकांनी सहभाग घेत आपल्या घराची सजावट करीत घरासमोर भालचंद्र महाराज यांचे देखावे तयार केले आहेत.