शाळकरी मुलीला बेदम मारहाण

शिक्षक किशोर गोसावी याच्यावर गुन्हा दाखल

कणकवली दि .०१ फेब्रुवारी (भगवान लोके)

तालुक्यातील कसवण येथील शाळा नंबर २ मध्ये असलेल्या एका तिसरी इयत्तेतील १० वर्षीय शाळकरी मुलीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्या शाळेचा शिक्षक किशोर गोसावी याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

त्या शाळकरी मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित शाळकरी मुलीला शाळेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत म्हणून त्या शाळेतील शिक्षक किशोर गोसावी याने त्या पीडित मुलीच्या पायावर व पाठीवर लाकडी छडीने बेदम मारहाण केली अशी फिर्याद त्या शाळकरी मुलीच्या पालकांनी दिली आहे. ही घटना ३१ जानेवारी रोजी घडल्याचे म्हटले आहे. या दाखल तक्रारीनुसार संशयित आरोपी किशोर गोसावी याच्या विरोधात भादवी ३२४ व अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५ चे कलम ७५ व ८२ नुसार कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालक वर्गात देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.