कणकवली दि.१ फेब्रुवारी(भगवान लोके)
पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली यांच्या प्रयत्नाने जात प्रमाणपत्र देण्यास सुरूवात झाली असून ठाकर समाज बांधवांनी जात प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह सादर करावे. तसेच काही समस्या उद्भवल्यास पंचक्रोशी ठाकर समाज च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील अनेक दिवस सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.काही समाज बांधवांना जात पडताळणी छानणी वेळी अवैध ठरवले होते. मात्र त्याचा ठपका ठेवत प्रांताधिकारी कणकवली दि.३ जानेवारी २०२३ रोजी कणकवली तालुक्यातील ठाकर समाज बांधवांना जात प्रमाणपत्र देणे बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार तहसिलदार कार्यालय कणकवली येथील सेतू विभागात ठाकर समाज जात प्रमाणपत्र अर्ज घेणे बंद केले. त्यामुळे ठाकर समाजतील शालेय विद्यार्थी व विविध योजनांचे लाभार्थी यांचे मोठे नुकसान झाले .अशी माहिती पंचक्रोशी ठाकर समाज अध्यक्ष अमित ठाकूर व सचिव समिर ठाकूर यांनी दिली.
त्याचप्रमाणे सदरील गंभीर बाब लक्षात घेत पंचक्रोशी ठाकर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच काही प्रस्ताव जात प्रमाणपत्रासाठी तहसिलदार कार्यालयातील सेतू विभागात देण्यात आले आहेत.त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विवध कारणांना योग्य प्रकारची कागदपत्रे अगदी पुराव्यासह दाखवून गेल्या वर्ष भरात रखडलेल्या दाखल्यांचा मार्ग मोकळा करण्यात पंचक्रोशी ठाकर समाजाला यश आले आहे.
यावेळी अनुसुचित जमाती जात पडताळणी समिती ठाणे चे डायरेक्टर दिनकर पावरा यांच्या सदरील बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर श्री.पावरा यांनी प्रांताधिकारी जगदिश कातकर यांना दाखले देण्याबाबत सुचना केल्या. मात्र,मिळालेल्या माहिती नुसार दाखले देणे बंद करा असे आदेश देण्यात आले होते.
बुधवारी प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर त्यांनी मागील अनेक दिवस प्रलंबित असलेले दाखले देण्यास सुरूवात केली.त्यापैकी सुहास संतोष ठाकर याचे जात प्रमाणपत्र कणकवली सेतू विभाग व प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सुहास संतोष ठाकर यांना प्राप्त झाले. प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्या हस्ते सुहास संतोष ठाकर यांना जात प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी पंचक्रोशी ठाकर समाजाचे अध्यक्ष अमित ठाकूर, सचिव समिर ठाकूर,कार्याध्यक्ष विठ्ठल ठाकूर, उपाध्यक्ष सच्चिदानंद ठाकूर,मदन ठाकूर,सचिन ठाकूर,रामजी ठाकूर, रामदार ठाकूर यांचे सहकार्य लाभले आहे.
ठाकर समाज बांधवांनी जात प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह सादर करावे. तसेच काही समस्या उद्भवल्यास पंचक्रोशी ठाकर समाज च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.