मालवण, दि.१ फेब्रुवारी
सहकार महर्षी कै. प्रा.डी. बी. ढोलम यांच्या पत्नी श्रीमती रतन (माई) धोंडी ढोलम (वय ८८) यांचे वराड कावळेवाडी येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
प्रा. डी. बी. ढोलम यांच्या सहकारातील यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकीय, सामाजिक अथवा शैक्षणिक कारकिर्दीत त्या नेहमी डी. बी. ढोलम यांच्या पाठीशी असायच्या. वाडीतील प्रत्येकाच्या सुखद व दुःखद प्रसंगात त्या सहभागी व्हायच्या. अनेक गरजूना त्यांनी मदत केली होती. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, सहकार क्षेत्रातील मंडळीनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, तीन मुली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. वराड कावळेवाडी येथील प्रसिद्ध सॉ मिलचे मालक प्रदीप ढोलम, बाबा ढोलम, उद्योजक देवेन ढोलम, सामाजिक कार्यकर्ते छोटू ढोलम यांच्या त्या मातोश्री होत.