दृष्टिहीन व्यक्तीची सेवा करणे ही परमेश्वराची सेवा केल्यासारखी- सतीश सावंत

राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघ यांच्या वतीने गोपुरी राष्ट्रीय दृष्टिहीन दिन साजरा

कणकवली दि .१ फेब्रुवारी(भगवान लोके)

दृष्टीहिन व्यक्तीची सेवा करणे म्हणजे परमेश्वराची सेवा करण्यासारखी आहे. राष्ट्रीय दृष्टीहिन महासंघ दृष्टीहिन व्यक्तींच्या हितासाठी जे काम करत आहे, ही बाब अतुलनीय आहे. दृष्टीहिन व्यक्तींना भिक्षागिरी करू नये याकरिता महासंघ त्यांचे मनपरिवर्तन करीत आहे. हा महासंघाला यापुढील जे सहकार्य लागेल, ते केले जाईल, अशी ग्वाही सतीश सावंत यांनी दिली.

राष्ट्रीय दृष्टिहीन दिनानिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेतर्फे वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील दृष्टिहीन व्यक्तींचा मेळावा आयोजित केला होता. याचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, डॉ. विद्याधर तायशेटे, मिळून साऱ्या जणी संघटनेच्या अध्यक्षा पूजा सावंत, दृष्टीहिन महासंघाचे कोकण प्रांताचे पदाधिकारी बाबूराव गावडे, सचिव शेखर आडवे, प्रकाश वाघ, बाळू मेस्त्री, अमित सावंत, पुरुषोत्तम सावंत, देवा रावले, अनिल शिंगाडे, रुपेश आमडोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. विद्याधर तायशेटे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दृष्टिहिन व्यक्तींसाठी राष्ट्रीय दृष्टिहिन महासंघ जे काम करीत आहेत,हे कौतुकास्पद आहे. अवयदान संघटनेचा मी जिल्हा समन्वयक असून या संघटनेच्या माध्यमातून आपल्या संघाला मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. आरंभी डॉ. हेलल केलर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील दृष्टिहीन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.