मूर्तिकार हे समाजाचे भूषण- मामा माडये

मालवण आंबेरी येथे भंडारी समाजातील मूर्तिकार,वैद्य यांचा सन्मान सोहळा संपन्न

मालवण ,दि.१ फेब्रुवारी
अयोध्या येथील राम मंदिरातील प्रभू श्री रामचंद्र यांची मूर्ती बनविणारा मुर्तिकाराचा आज जगाला हेवा वाटतो. त्याचप्रमाणे आमचे समाज बंधू मूर्तिकार हे आमच्या समाजाचे भूषण आहेत. त्याचा देखील आम्हाला हेवा वाटतो. कारण सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाची मूर्ती घडविण्याचे मौलिक कार्य त्यांच्या हातून घडत असते. त्यांच्या कलाकुसरीमुळे त्यांचे समाजात नाव असते. त्याच त्यांच्या नावासोबत समाजाचे नाव होते. मूर्तिकार हे आपल्या कलेतून समाजाला बऱ्याच शिकवणी देऊ शकतात. समाजाला योग्य दिशा देऊ शकतात अशा या आमच्या समाज बांधवांचा पाठीशी आम्ही समाज म्हणून खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन भंडारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष मामा माडये यांनी आंबेरी येथे मूर्तिकार बांधव व आयुर्वेदिक वैद्य यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना केले.

मालवण तालुक्यातील आंबेरी येथे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ व आंबेरी भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारी समाजातील गणेश मूर्तिकार व आयुर्वेदिक वैद्य यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, भंडारी समाज अध्यक्ष आंबेरी राजन सारंग, कुणकवळे माजी सरपंच आनंद वराडकर, माजी प. स. सदस्या श्रध्दा केळुसकर, तळगाव सरपंच लता खोत, वराडकर हायस्कूल कट्टा मुख्याध्यापक संजय नाईक, दिलीप वेंगुर्लेकर, प्रदीप आवलेगावकर, ऍड. प्रदीप मिठबावकर, सुरेश कांबळी, निलेश हडकर, गणेश वाईरकर, विद्याधर चिंदरकर, भाई आचरेकर, प्रवीण जावकर, सुशांत वाक्कर, किशोर वाक्कर, शरद केळुसकर, दिलीप खोत, बाबू कांबळी, पो. पा. दिलीप राऊत, सागर राऊत, अंकुश मांजरेकर, शशिकांत पाटकर व अन्य समाज बांधव मूर्तिकार, वैदय महिला वर्ग उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी भंडारी समाजातील सुमारे ५० मूर्तिकार व ६ आयुर्वेदिक वैद्य यांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या कार्यकारिणी सदस्य, युवा पिढीचे समाज बांधव यांनी पुढाकार घेऊन समविचारी लोकांना एकत्र आणून असेच दर्जेदार कार्यक्रम यापुढे देखील केले जातील असे जाहीर केले.

यावेळी संजय नाईक, मनमोहन डीचोलकर, राजन सारंग, मूर्तिकार संतोष नागवेकर, सुरेश कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. प्रदीप मीठबावकर, सूत्रसंचालन गणेश डीचोलकर तर आभार श्रध्दा केळुसकर यांनी मानले.