परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मोत्सव सोहळा ;कणकवलीत परमहंस भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक
कणकवली दि.१ फेब्रुवारी(भगवान लोके)
योगियांचे योगी व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२० वा जन्मदिन संस्थानात भक्तीमय वातावरणात पार पडला. भालचंद्र महाराज यांचा जन्मदिन सोहळा पाहण्यासाठी लक्षणीय भाविकांनी उपस्थिती होती, हा सोहळा भाविकांनी देही याची डोळा पाहिल्याने त्यांचे डोळ्यांचे पारणे फिटले. सायंकाळी भालचंद्र महाराज यांची शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी केलेल्या भालचंद्र महाराज यांच्या जयघोषामुळे कणकवलीनगरी दुमदुमून अन् भालचंद्रमय झाली. भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची गुरुवारी रिघ लागली होती. यासोबतच समाधीस्थळी विविध फळांची आरस करण्यात आली होती. यामुळें बाबाची मूर्ती सर्वांगसुंदर दिसत होती. महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त गेले चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले
गुरुवारी पहाटे काकड आरती, समाधीपूजा, जपानुष्ठान हे धार्मिक विधी पार पडले. गुबाली थंडीत पहाटे असंख्य भाविक काकड आरती म्हणत वातावरण भक्तीमय केले. सकाळच्या सत्रात भजनी कलाकारांनी भजने सादर करून महाराज यांच्या चरणी सेवा अर्पण केली. त्यानंतर ब्रह्मवृंदांनी मंत्रोपचारात समाधीस्थानी लघुरुद्र केला, भालचंद्र महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ह. भ. प. भाऊ नाईक यांनी कीर्तन सादर केले. दुपारी संस्थानात भालचंद्र महाराज यांचा जन्म सोहळा पार पडला. हा सोहळा भाविकांनी याची देही, याची डोळा पाहिला. तत्पूर्वी वरवडे- फणसनगर येथील ख्रिस्तीबांधवांनी वाद्य वादन करत सोहळ्यात रंगत आणली, भालचंद्र महाराज यांची महाआरती झाली. त्यानंतर असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी ६ ३० वाजता प. पू. भालचंद्र महाराज यांची शहरातून ढोल – ताशसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यात वारकरी सांप्रदायाचे वारकरी, भक्तमंडळी सहभागी झाले होते. पालखीच्या दिमतीला घोडे व उंट देखील होते. तसेच या मिरवणुकीत हंसाच्या रथातून बाबांची मूर्ती मिरवणूक काढण्यात विविध प्राण्यांचे देखावे व कोंबडी हे यामध्ये खास आकर्षण होते .
यावेळी पायी हळूहळू चाला मुखाने भालचंद्र बोला…. घोषणामाचा माझ्या भालचंद्र बाबांचा…असा जयघोष करीत कणकवलीनगरी दुमदुमून सोडली. पालखी मार्गावरील रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि भालचंद्र महाराज यांचे देखावे तयार करण्यात आले होते. पालखी मिरवणुकी असंख्य भाविक सहभागी झाले होते. त्यांना ठीक ठिकाणीं मंडळांकडून अल्पोहार देखील ठेवण्यात आला होता.ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करत मोबाईलमध्ये मिरवणुकीचे क्षण टिपले. पालखी रात्री संस्थानात दाखल झाल्यानंतर नित्य आरती करण्यात आली. त्यानंतर लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तृत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा व्यंकटेश ‘पद्मावती’ हा प्रयोग सादर झाल्याने उत्सवाची सांगता झाली.