शिक्षक भारती व सेवांगणतर्फे जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न

मालवण,दि .१ फेब्रुवारी

शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ केंद्रावर इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न झाली. या सराव परीक्षेत जिल्ह्यातील २३५० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते या परीक्षेचा शुभारंभ झाला. या सराव परीक्षेमुळे विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील, असा विश्वास वराडकर यांनी व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक
संजय नाईक यांनी सराव परीक्षेचा हा उपक्रम गेली १५ वर्ष सातत्याने सुरू असल्याचे सांगत यामध्ये संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. प्रसाद परुळेकर यानी सराव परीक्षेचे महत्व विषद केले. यावेळी संजय नाईक, बापू वराडकर, दीपक भोगटे, महेश भाट, प्रकाश कानूरकर, श्री. वाजंत्री, श्री. गावडे, श्री. सरनाईक, बाळकृष्ण गोंधळी, अर्जून पेंडूरकर, मनोज काळसेकर आदी उपस्थित होते.

या परीक्षेचे नियोजन शिक्षक भारतीचे
जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर व त्यांचे सर्व पदाधिकारी व सहकारी शिक्षक, शिक्षक भारतीचे सर्व तालुक्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी केले. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करून गुणवंतांचा सत्कार समारंभही घेण्यात येईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.