अमरहिंद मंडळाच्या डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धेत

माहीम वॉरियर्स वि. दादर पॅंथर्स व वरळी फिनिशर्स वि. परेल रुद्रास उपांत्य फेरीत लढणार

कुशल शिंदे, सिध्दार्थ कोळी व आत्माराम पालव यांना अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार

मुंबई,दि .१ फेब्रुवारी

अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या दादरच्या अमरवाडी मैदानावर, गोखले रोड येथे सुरू असलेल्या डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धेत आज झालेले तिन्ही सामने अतिशय चुरशीचे झाले. माहीम वॉरियर्सने साखळीतील सर्व सामने जिंकत १५ गुणांसह प्रथम स्थान मिळवले, वरळी फिनिशर्सने ९ गुणांसह दुसरे स्थान तर परेल रुद्राज व दादर पँथर्स ७ गुणांसह तसऱ्या व चौथ्या स्थानावर राहिले. समान गुणांमुळे परेल रुद्राज व दादर पँथर्स यांच्यात एक डाव खेळवला गेला व त्यात परेल रुद्राजने बाजी मारत तृतीय स्थान पटकावले. या सामन्यांमध्ये कुशल शिंदे (माहीम वॉरियर्स), सिध्दार्थ कोळी (दादर पँथर्स) व आत्माराम पालव (लालबाग स्पार्ट्सन) यांना अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

माहीम वॉरियर्सने परेल रुद्राजचा २०-१५ असा ५ गुणांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. माहीम वॉरियर्सच्या आयुष गुरव (३.०५ मि. संरक्षण व २ गुण), कुशल शिंदे (१.३० मि. संरक्षण व ३ गुण), रोहन टेमकर (३ मि. संरक्षण), जनार्दन सावंत (१.२० मि. संरक्षण) यांनी दमदार कामगिरी करत साखळी तील सर्व सामने जिंकण्यात मोलाचा वाट उचलला. परेल रुद्राजकडून आदित्य टेमकर (१.३० मि. संरक्षण), सुरज खाके (१.५० मि., १.२० मि. संरक्षण व १ गुण), पियुष घोलम (१.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला. मात्र त्यांना विजय साकरता आला नाही. या सामन्यात कुशल शिंदे सामनावीर ठरला.

दुसऱ्या सामन्यात दादर पँथर्सने वरळी फिनिशर्सचा १९-१८ असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने पराभव केला. ड्रिम रनच्या जोरावर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. दादरकडून सिध्दार्थ कोळी (२.१० मि., १.४० मि. संरक्षण), प्रतिक होडावडेकर (३ मि. संरक्षण व १ गुण), अक्षय खापरे (२.१० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळामुळे विजय मिळवता आला. वरळीतर्फे वेदांत देसाई (३.४० मि. संरक्षण), शुभम शिंदे (२.१० मि. संरक्षण व १ गुण), सनी तांबे (१.५० मि. व १ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला.

तिसऱ्या सामन्यात माटुंगा फायटर्सने लालबाग स्पार्ट्सनचा २५-१२ असा १३ गुणांनी सहज पराभव केला. माटुंगा फायटर्सतर्फे प्रसाद राडीये (१.४०, ३.३० मि. संरक्षण व १ गुण), सुशील दहिबेकर (२.२५ मि. संरक्षण), शुभम कांबळे (१.४५, १ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला. लालबागतर्फे प्रणय प्रधान (१.२५ मि. संरक्षण), वितेश काटे (३ गुण), आत्माराम पालव (१.५०, १.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला.