सावंतवाडी,दि २ फेब्रुवारी
लाखो रुपये खर्च करून नव्याने खेळपट्टी तयार केलेल्या जिमखाना मैदान शासकीय कार्यक्रमासाठी देण्यात येत असल्याने शहरातील क्रीडा प्रेमींनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत तीव्र नाराजी व्यक्त केली मैदानाच्या मुख्य खेळपट्टीची सुरक्षा व हानी टाळण्यासाठी हे मैदान अशा कार्यक्रमांना देऊ नका अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
तर सदरचा कार्यक्रम हा शासकीय असल्याने परवानगी नाकारू शकत नाही मात्र मैदानाला कुठलेही हानी पोहचू नये याची खबरदारी निश्चितच घेतली जाईल असे ग्वाही यावेळी मुख्याधिकारी श्री साळुंखे यांनी दिली.
सावंतवाडी जिमखाना मैदानावर राज्यस्तरीय शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे याच्या पूर्वतयारीसाठी आज मैदानावर यंत्रणा दाखल झाली याबाबत क्रीडा प्रेमींना माहिती मिळताच त्यांनी एकत्र येत थेट नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना धडक दिली. मध्ये माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव यांच्यासह रुपेश राऊळ काशिनाथ दुभाषी अनिल केसरकर सिताराम गावडे मायकल डिसोजा याकूब शेख विनायक पराडकर गुरुनाथ चोडणकर राजू कासकर संतोष केनवडेकर आदी उपस्थित होते.
शहरातील जिमखाना मैदानावर अलीकडेच लाखो रुपये खर्च करून नव्याने खेळपट्टी बनवण्यात आली आहे परंतु क्रिकेट सोडून या ठिकाणी लग्न सोहळा अन्य खाजगी कार्यक्रमासाठी मैदान पालिकेकडून उपलब्ध करून दिले जाते याचा परिणाम खेळपट्टीवर होतो अलीकडेच दिलेल्या एका खाजगी कार्यक्रमामुळे मैदानाची पूर्ण वाट लागली होती या ठिकाणी झालेली शेवटी मोठी नुकसानीची दुरुस्ती ही अद्यापही करण्यात आलेली नाही आणि आता पुन्हा एकदा हे मैदान क्रिकेट सोडून अन्य कार्यक्रमासाठी दिले जात आहे हे चुकीचे आहे.
या मैदानावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू खेळले आहेत सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूने या मैदानावर सामने खेळले आहेत तसेच लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षणही या ठिकाणी दिले जाते असे असताना या मैदानाला चांगला इतिहास असूनही ते खाजगी कार्यक्रमाला देणे अयोग्य आहे असे माजी नगरसेवक वारंग यांनी सांगितले तर हे मैदान कुठल्याच कार्यक्रमाला उपलब्ध करून देऊ नका अशी एक मुखी मागणी क्रिकेट प्रेमींनी केली. दरम्यान सदरचा कार्यक्रम हा शासकीय असल्याने आपण परवानगी नाकारू शकत नाही मात्र क्रिकेट प्रेमींची विनंती लक्षात घेता या मैदानाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये मैदानाची पुरेपूर सुरक्षा कशी राखता येईल याची काळजी घेतली जाईल तसेही मुख्य खेळपट्टीला संरक्षण देऊनच तसेच मैदानाच्या बॉण्ड्रीच्या बाहेर जास्तीत जास्त मैदानाचा वापर या कार्यक्रमासाठी केला जाणार आहे त्यामुळे आपण स्वतःहून मैदानाच्या सुरक्षतेबाबत खबरदारी घेईल अशी ग्वाही मुख्याधिकारी श्री साळुंखे यांनी दिली. यावेळी नंदकिशोर रेडकर प्रवीण खटावकर जितू मोरजकर किरण मिस्त्री आनंद आळवे गुरु पेडणेकर रॉबर्ट माडतीस ओमकार कुरतडकर विनायक दांडेकर आदी क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
चौकट
राजकीय दबावापोटी
परवानगी देऊ नका
जिमखाना मैदानावर क्रिकेट व्यतिरिक्त इतर कुठलेही कार्यक्रम होऊ नये या मताचा मी आहे या मैदानाची वाट लागली असताना या ठिकाणी शासकीय कार्यक्रम होणे चुकीचे आहे आपल्याला राजकीय दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित करत राजकीय दबावापट्टी मैदान उपलब्ध करून देऊ नका असे यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.