केंद्र व राज्य सरकारच्या यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचवा-संजू परब

वेंगुर्ला,दि.२ फेब्रुवारी

२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन ‘गाव चलो अभियान‘चे जिल्हा सहसंयोजक संजू परब यांनी केले .
वेंगुर्ला तालुक्याची ‘गाव चलो अभियाना‘ ची बैठक तालुका कार्यालयात संपन्न झाली. यावेळी भाजपाचे राजन तेली, शरद चव्हाण, प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा खानोलकर, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल यांच्यासह भाजपाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘गाव चलो अभियान‘च्या वेंगुर्ला तालुका संयोजक म्हणून साईप्रसाद नाईक व सहसंयोजक म्हणून बाबली वायंगणकर व पपू परब यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ‘गाव चलो अभियान‘ सुरु करण्याचा आदेश दिलेला असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ ते ११ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबवून जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा आहे. या अभियानात प्रत्येक बुथवर एक ‘प्रवासी कार्यकर्ता‘ आठवडाभर त्याला दिलेल्या बुथवर जाऊन लाभार्थ्यांशी संवाद, युवक, शेतकरी, व्यवसायीक यांच्या गाठीभेटी, प्रभावशाली व्यक्तिंशी संवाद , विचार परिवारातील कार्यकर्त्यांच्या भेटी, स्वयंसेवी संस्था तसेच बचत गटातील महिला प्रतिनिधींशी भेट घेऊन व बुथ समिती व पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील असलेल्या जबाबदा-या सोपवून प्रत्येक बुथवर ५१ टक्के पेक्षा अधिक मते मिळविण्याचे नियोजन करावे असे आवाहन राजन तेली यांनी केले.
या अभियानाच्या अनुषंगाने प्रत्येक पंचायत समिती निहाय बैठकांचे नियोजन करून जबाबदारीचे वाटप करण्यात आले.