जागृती आयडॉल पुरस्कारांची घोषणा

वेंगुर्ला,दि.२ फेब्रुवारी

वेंगुर्ल्यात ३ व ४ रोजी होणा-या शाश्वत कला क्रीडा जागृतोत्सवाचे औचित्य साधून जागृती आयडॉल पुरस्कारांची घोषणा नुकत्याच झालेल्या बैठकीत जागृतीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर व शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेचे महेंद्र मातोंडकर यांनी केली आहे. जागृती मंडळाच्या माध्यमातून नावारूपात आलेल्या व्यक्तिमत्त्वांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
त्याकाळी अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावणा-या जागृतीच्या खेळाडू व कुडाळ पोलीस दलात कार्यरत असताना गतवर्षी दिवंगत झालेल्या रेश्मा प्रभाकर पालकर (प्रशंसा प्रितम कदम), सध्या वेंगुर्ला पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या रुपाली बाबी वेंगुर्लेकर, अनेक नवीन खेळाडू घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या संजीवनी परब-चव्हाण, अनेक पारितोषकांचे मानकरी असलेले जागृतीचे यशस्वी खेळाडू शेखर उर्फ यशवंत शशिकांत साळगावकर, व्हळीयप्पा बसप्पा तलवार, झी २४ तास न्यूज चॅनेलच्या मनोरंजन विभागाची प्रमुख सायली कौलगेकर, लंडन युनिव्हसिटीमधून मर्चंट नेव्हीची थर्ड ऑफिसर परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याच क्षेत्रात कार्यरत असलेले शुभम शशिकांत परब व वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये सिव्हिल इंजिनियरपदी कार्यरत असलेले विवेक विनायक शिरसाट यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
जागृती मंडळाच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील अनेक मुलांना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नाव कमावण्याची संधी मिळाली होती. जागृतीचे अनेक खेळाडू आज विविध पदांवर कार्यरत आहेत. जागृतीच्या सांस्कृतिक कलाक्षेत्रातून स्वतःची ओळख निर्माण करणारे अनेक गुणी कलावंतदेखील विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा गुणी व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी पाच गुणी व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या बैठकीस जागृतीचे सचिव अमोल सावंत, सांस्कृतिक प्रमुख विवेक राणे, ऐश्वर्या मालवणकर, शशीकांत परब, शंकर कोणेकर, पंकज शिरसाट, अमृत काणेकर, प्रशांत मालवणकर, मयूर वेंगुर्लेकर, ओंकार परब, जयेश सोनुर्लेकर आदी उपस्थित होते.
जागृतोत्सवात राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. महोत्सवाला वेंगुर्लेवासीयांनी उपस्थिती दर्शवावी, कसे आवाहन शाश्वत सेवा संस्था व जागृती मंडळातर्फे करण्यात आले आहे.