मालवण,दि.६ नोव्हेंबर
मालवण भरड येथील रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक व योग शिक्षक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश रामचंद्र चव्हाण (वय ८४) यांचे रविवारी ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
रमेश चव्हाण हे चव्हाण गुरुजी म्हणून परिचित होते. त्यांचा जन्म मीठबाव – तांबळडेग येथे झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्यपूर्व काळात सैन्यात होते. भारताच्या फाळणीनंतर चव्हाण कुटुंब कराची मधून मुंबई मध्ये आले. पेशाने शिक्षक असलेले रमेश चव्हाण हे मुंबईत शिक्षकी सेवा बजावून निवृत्त झाल्यानंतर मालवण मध्ये आले. गणित, विज्ञान विषयात त्यांचा हातखंडा होता. चव्हाण हे उत्तम मल्लखांबपटूही होते. त्यांनी योग विद्येत प्राविण्य मिळवीत शारीरिक व्याधीपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर समाजात योग शिक्षक म्हणून कार्यरत राहून अनेक योग प्रशिक्षण शिबिरातून मार्गदर्शन केले. अध्यात्मावरही त्यांची चांगली पकड होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेत कार्यरत राहून त्यांनी अनेक सामाजिक कार्येही केली. अयोध्येतील राम जन्म भूमी आंदोलनातही त्यांनी कारसेवक म्हणून सहभाग घेतला होता. शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक व योग क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या रमेश चव्हाण यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालवण मधील डॉ. रामचंद्र चव्हाण यांचे ते वडील होत.