जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक – विजय चौकेकर

 मालवण,दि.२ फेब्रुवारी

देव धर्माच्या नावाने सर्व सामान्य जनतेला लुबाडणाऱ्या आणि जादूटोणा करून फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबां विरोधातील आमचा लढा आहे. त्यांच्या फसवणूकीला बळी पडण्यापासून वाचण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनच अवलंबला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी वेरली येथे बोलताना केले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रसार आणि प्रचार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरली नं. १ येथे मुख्यमंत्री माझी स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत बालक पालक यांच्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती वेरली नं . १ चे अध्यक्ष नारायण पोयरेकर व सचिव तथा मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार यांनी ‘अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा’ या उपक्रमात अंतर्गत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा २०१३ चे प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित केले होते. प्रारंभी प्रास्ताविक उमेश खराबी यांनी केले.

यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थांना विजय चौकेकर यांनी मार्गदर्शन करताना देवी अंगात येणे, भूत अंगात येणे ,करणी- भानामती करणे, मंत्राने लोकांचे रोग बरे होतात का? मंत्राने सापाचे विष उतरले जाते का? याविषयीची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाद्वारे करून दिली. विजय चौकेकर यांचा शाळेचे स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण पोयरेकर, मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार, उपसरपंच दिनेश परब, माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गौतम तांबे, शिक्षक उमेश खराबी, शिक्षिका विमल खराबी, शिक्षणप्रेमी कल्याणी तांबे, माजी शिक्षणप्रेमी धर्मसिंधू तांबे, पत्रकार अनिल तोंडवलकर, पालक सत्यवती परब, समृद्धी तोंडवळकर, भाग्यश्री परब, अनिता लाड, आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार शिक्षिका विमल खराबी यांनी मानले.