मोती तलावातील मासे मृत्यू होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांनी घटले…

मुख्याधिकार्‍यांचा दावा; सांडपाणी सोडणार्‍यांचे सर्व्हेक्षण, कारवाई करणार…

सावंतवाडी,दि.२ फेब्रुवारी:

पॅडल बोटीच्या माध्यमातून मोती तलावातील पात्र साफ करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. परिणामी माशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांनी घटले आहे, तरीही ही मोहीम सुरू राहणार आहे, असा दावा सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केला आहे. दरम्यान तलावाचे पाणी खराब होण्यास बाहेरून सोडण्यात येणारे सांडपाणी जबाबदार आहे. त्यामुळे सांडपाणी कोठून सोडले जात आहे याचे सर्व्हेक्षण सुरू असून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मोती तलावातील माश्यांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गेले काही दिवस प्राणी प्रेमींकडुन नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर श्री. साळुंखे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनीही माहिती दिली. ते म्हणाले, सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात दव पडत असल्यामुळे माश्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडथळा येतो, असे तज्ञाचे मत आहे. त्याला सांडपाणी सुध्दा तितकेच कारणीभूत आहे. तरीही पाण्यावर आलेला तवंग दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पॅडल बोटी फिरवण्यात येत आहे. पात्रात मोठ्या प्रमाणात असलेली जलपर्णी काढण्यात आली आहे. त्यामुळे आता मासे मरण्याचे प्रमाण कमी झाले असून आठवडाभरापुर्वी हा आकडा शंभर पेक्षा जास्त होता. मात्र आता दोन-चार मासे मेलेले दिसत आहे. काही दिवसांनी हा आकडा थांबेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.