राजकीय दबावापोटी जिमखाना मैदान कोणाला वापरायला देवू नका…

ठाकरे सेनेची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी; रुपेश राऊळांनी व्यक्त केली नाराजी…

सावंतवाडी,दि.२ फेब्रुवारी

राजकीय दबावापोटी सावंतवाडीचे जिमखाना मैदान कार्यक्रम तसेच अन्य वापरासाठी देवू नका, तर त्या ठिकाणी खेळणार्‍या मुलांचे भवितव्य लक्षात घेवू योग्य तो कठोर निर्णय घ्या, अशी मागणी आज ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान या ठिकाणी मैदानाला नुकसान होईल असे काहीही केले जाणार नाही. पीचचा भाग झाकुन अन्य ठिकाणी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे स्टॉल लावण्यात येत आहे. राज्यस्तरीय कार्यक्रम आहे त्यामुळे सर्वानीच सहकार्य करा, असे आवाहन श्री. साळुंखे यांनी यावेळी केले.
सावंतवाडी जिमखाना मैदानावर ९ तारखेपासून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होत आहे. या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी मैदान अन्य कारणासाठी वापरण्यात येवू नये, अशी मागणी आज सर्व पक्षीय तसेच क्रीडा प्रेमींकडुन करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली.
यावेळी रुपेश राउळ यांनी श्री. साळुंखे यांचे लक्ष वेधले. आमचा विज्ञान प्रदर्शनास विरोध नाही. परंतु त्या ठिकाणी खोदाई होणार असल्यामुळे त्याचा फटका मैदानाला बसणार आहे. त्यामुळे तेथे खेळणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान हा कार्यक्रम शासनाचा असल्यामुळे आपण विरोध करू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी मैदानाला नुकसान होणार नाही याची दक्षता आम्ही घेवू, असे श्री. साळुंखे म्हणाले.