बांद्यात बेकायदा दारूसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त -बांदा पोलिसांच्या तीन कारवाया

बांदा ,दि. ११ नोव्हेंबर

बांदा पोलिसांनी बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात केलेल्या वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये एकूण ८ लाख ५७ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गाळेल येथे केलेल्या दोन कारवायांमध्ये कारमधील दोघेही संशयित चालक थरारक पाठलागानंतर पळून जाण्यात यशस्वी झाले. इन्सुली चेकपोस्टवर केलेल्या दारू कारवाईत अमोल लक्ष्मण चिंदरकर (३४, रा. कलमठ, कणकवली) याला ताब्यात घेण्यात आले. सदर तीनही कारवाया सोमवारी दुपारी करण्यात आल्यात.
याबाबत अधिक माहिती अशी की, गाळेल – खालचीवाडी येथे गोव्याहून येणाऱ्या स्विफ्ट कार (एमएच ०२ डीएस ५६०७) आणि (एमएच ०२ बीडी ७७८१) या दोन्ही गाड्यांना तपासणीसाठी थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र पोलिसांच्या आदेशाला न जुमानता दोन्ही चालकांनी कार गोव्याच्या दिशेने पळविल्या. पोलिसांनीही कारचा थरारक पाठलाग केला. पोलीस मागावर असल्याचे पाहून चालकांनी वारखंड (गोवा) येथे रस्त्यावर कार टाकून चालक पळून गेले. पोलिसांनी दोन्ही कार व त्यामधील मुद्देमाल जप्त केला. दोन्ही अज्ञात इसमाविरोधात बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
इन्सुली चेक पोस्ट येथे गोव्यातून सिंधुदुर्गच्या दिशेने येणारी इनोव्हा कार (एमएच ४३ व्ही २८२९) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये सुमारे ४८ हजार रुपयांचा गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी अमोल लक्ष्मण चिंदरकर या तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.