पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या प्रकाराने बिहारला देखील महाराष्ट्राने मागे टाकलं आहे का?-डॉ जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी दि.३ फेब्रुवारी
महाराष्ट्राचा बिहार झाला आहे हे वारंवार दिसत आहेच, अनेक उदाहरणांवरून ते सिद्ध होत आहे…पण काल उल्हासनगरमध्ये एका पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या प्रकाराने बिहारला देखील महाराष्ट्राने मागे टाकलं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.असे सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर भाजपच्या स्थानिक आमदारांनी शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर एकामागोमाग एक पाच गोळ्या झाडल्या आहेत.काल रात्री उशिरा घडलेला हा प्रकार महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा कसा उडालेला आहे हे स्पष्टपणे दाखवणारा आहे, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

एक सत्ताधारी पक्षाचा आमदार जमिनीच्या वादातून सत्तेत असलेल्या मित्र पक्षाच्या माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख असलेल्या पदाधिकाऱ्याला पोलिस अधिकाऱ्यासमोरच पाच गोळ्या झाडतो आणि वर “होय मीच गोळ्या मारल्या हे सांगतो”, हे सगळं सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी धक्कादायक आणि भयावह आहे, असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात जागोजागी गुंड पाळलेले आहेत”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आणि यापुढे ते भाजपशी देखील गद्दारी करतील ” अशी वक्तव्ये सदर भाजप आमदारांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केलेली आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील सत्तेत एकत्र असलेल्या भाजपच्या सदर आमदाराने केलेली आहे, त्यामुळे जनतेला आश्चर्य वाटले असे त्यांनी सांगितले.

खरा प्रश्न हा आहे की दोन महिन्यांवर लोकसभा निवडणूका येऊन ठेपलेल्या आहेत, अशावेळी राजकीय खुनांचा रक्तरंजित इतिहास असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेमध्ये खून मारामाऱ्या आणि राडे पुन्हा सुरू होतील का?अशी भिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेत पसरली आहे.
मुख्यमंत्री यांनी पाळलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुंड कोण अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये होत आहे, असा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात
डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे .