पैशापेक्षा आनंद देणारी कला म्हणून मूर्ती, चित्र व शिल्प कलेची ओळख- ज्येष्ठ चित्रकार दादा मालवणकर

सावंतवाडी दि.३ फेब्रुवारी

पैशापेक्षा आनंद देणारी कला म्हणून मूर्ती, चित्र व शिल्प कलेची ओळख आहे. या कलेतून आनंद मिळाला पाहिजे. पैसा हा आपोआप मिळत जाईल.आपण स्वतः मूर्ती घडविताना जो आनंद मिळतो तो फारच शुभदायक असतो. आयुष्यात आनंद देणाऱ्या अशा कलांचे कौशल्य आपल्यापाशी असावे. आजच्या विद्यार्थी, तरुण पिढीने देखील या कलेवर प्रेम करावे असे मत ज्येष्ठ चित्रकार दादा मालवणकर यांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तिकार संघ व देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन चित्रकला महाविद्यालय देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मूर्ती, चित्रकला प्रदर्शन व मूर्ती बनवण्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दादा मालवणकर बोलत होते.
यावेळी मूर्तिकार संघाचे जिल्हाध्यक्ष नारायण उर्फ बापू सावंत, देवरुख महाविद्यालयाचे चित्रकार प्रा विक्रम परांजपे, पत्रकार अभिमन्यू लोंढे,देवरुख महाविद्यालयाचे प्रा अवधूत पोटफोडे व श्री प्रा मराठे ,अजय सायगावकर ,उदय अळवणी, मनोहर सरमळकर, विजय मेस्त्री, दीपक जोशी, आबा सावंत, प्रसाद मेस्त्री, आनंद माणगावकर, अजय परब आणि जिल्हाभरातील मूर्तिकार उपस्थित होते.

यावेळी मूर्तिकार संघाचे जिल्हाध्यक्ष बापू सावंत म्हणाले, पर्यावरण पूरक गणेश मुर्त्या बनाव्यात म्हणून आम्ही चळवळ सुरू केली आहे . ही चळवळ आम्ही जोमाने पुढे नेत आहोत .मूर्ती, चित्र,व शिल्पकला ह्या कला शाडू मातीच्या असाव्यात. आम्ही शाडू माती, कागदाचा लगदा अशापासून मुर्त्या बनवण्याचे मार्गदर्शन वर्गही घेतले आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला असे ते म्हणाले. या कला शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग असतो आणि तो आमच्या दृष्टीने प्रेरणादायी असावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो .मातीच्या गणेश मूर्ती पूजन करण्याचे हे पारंपारिक प्रयत्न भाद्रपद महिन्यात हिंदू धर्मशास्त्रानुसार होतात आणि त्यातून मातीची देखील पूजा होते आणि ते पर्यावरण पूरक ठरतात ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे.

देवरुख महाविद्यालयाचे श्री मराठे म्हणाले, देवरुख महाविद्यालय हे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना मूर्ती, शिल्प व चित्रकला प्रशिक्षण मिळावे आणि कोकणातून कलाकार बनावे हा एकमेव उद्देश आहे पर्यावरण पूरक मुर्त्या बनवण्यासाठी देखील आमची चळवळ आहे विद्यार्थ्यांनी या कला निश्चितच पुढे नेल्या पाहिजेत.
यावेळी पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले, सिंधुदुर्ग मूर्तिकार संघाने पर्यावरण पूरक गणेश मूर्तींसाठी चळवळ उभी केली आहे.ती पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची आहे. चित्र, मूर्ती व शिल्पकला या जीवनात आनंद देणाऱ्या कला आहेत . हा छंद कौशल्य विकासासाठी देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही कला मोठ्या जोमाने जोपासला पाहिजे.
या वेळी दादा मालवणकर तसेच चित्रकार अजय परब, आनंद माणगावकर व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर सरमळकर यांनी शानदार केले
या चित्रकला प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर चित्रकार प्रा. विक्रम परांजपे यांनी व्यक्तिचित्रण, प्रात्यक्षिक व चित्रकला करिअर मार्गदर्शन केले त्यांनी समोर व्यक्तीला बसवून हुबेहूब चित्र रेखाटले तसेच सायंकाळी स्थिरचित्रण, प्रात्यक्षिक चित्रकार प्रा. अवधूत पोटफोडे यांनी केले.
सावंतवाडी काझी शहा उद्दीन हॉल सावंतवाडी येथे सुरू असलेला कार्यक्रम उद्या रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी देखील सुरू असणार असून सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वस्त्र मंत्रालय व हस्तकला विभागामार्फत मूर्तिकारांचे आरटीओ फॉर्म तसेच पंतप्रधान विश्वकर्मा माहिती व रजिस्ट्रेशन आणि सायंकाळी चार वाजता दोन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्यांच्या बक्षीस वितरण समारंभ देखील होईल असे अध्यक्ष बापू सावंत व उदय अळवणी यांनी म्हटले आहे.