उद्धव ठाकरे यांची संवाद सभा ४ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी गांधी चौकात होणार

सावंतवाडी दि.३ फेब्रुवारी

सावंतवाडी शहरांमध्ये उद्या रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संवाद सभा सावंतवाडी गांधी चौकात होणार आहे. ती उत्स्फूर्त व्हावी म्हणून ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार नियोजन केले आहे सर्वत्र बॅनरबाजी देखील केली आहे.
खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते ,तालुका प्रमुख रुपेश राऊळ ,बाळा गावडे, महिला संघटक जान्हवी सावंत, शहर प्रमुख शैलेंद्र गौंडळकर आदी पदाधिकाऱ्यांनी सभेचे नियोजन केले.
शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा आमदार आणि मंत्री दिपक केसरकर झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केसरकर आणि चाळीस आमदारांनी उध्दव ठाकरे यांना धक्का दिला. त्यानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सावंतवाडी दौऱ्यावर येत आहेत .त्यामुळे ते सावंतवाडीत तळपत्या उन्हात काय बोलतात याकडे लक्ष वेधले आहे.केसरकर यांना दोन वेळा उमेदवारी देऊन विजयी करण्यासाठी शिवसैनिक ,शिवसेना नेत्यांनी मेहनत घेतली मात्र ते शिवसेनेत राहिले नाही याबाबत नक्कीच उद्धव ठाकरे बोलतील अशी आशा शिवसैनिकांना आहे
याशिवाय लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील शिंदे शिवसेना आणि भाजपाच्या युती बाबत देखील जोरदार हल्ला करतील असे बोलले जात आहे. आज सायंकाळी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, तालुका प्रमुख रुपेश राऊळ व पदाधिकाऱ्यांनी सभेचे नियोजन केले.