किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात बसविण्यात आलेल्या दगडी सिंहासनाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते

मालवण दि ०३ फेब्रूवारी

किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात बसविण्यात आलेल्या दगडी सिंहासनाचे लोकार्पण उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दगडी सिंहासन तयार करण्यात आले ही आनंदाची बाब आहे परंतु एकीकडे सिंहासन बसवित असताना शिवराजेश्वर मंदिरात सभामंडपात ज्या फरश्या, ग्रेनाईटच्या लाद्या बसविण्यात आल्या आहेत त्यामुळे त्या वास्तूचे ऐतिहासिक वास्तूपण बाजूला पडले आहे. माजी मुख्यमंत्री ठाकरे हे कलेचे जाण असणारे, फोटोग्राफर तसेच इतिहासाची माहिती असणारे असल्याने त्यांनी मंदिराची मॉर्डन पद्धतीने झालेली डागडुजी पहावी व ही वास्तू ऐतिहासिक कशी राहील याकडे लक्ष द्यावे अशी टीका मनसे नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात आपल्या आमदार फंडातून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सिंहासन बनविले असून मंदिराचीही डागडुजी केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर एकप्रकारे टिकेची झोड उठविली आहे.

पत्रकात श्री उपरकर यांनीं म्हटले आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या मालवण दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण होणार आहे. आमदार वैभव नाईक यांनी आमदार फंडातून मंदिरात सिंहासन बसविले त्याबद्दल आनंदच आहे परंतु हे करीत असताना शिवराजेश्वर मंदिराची जी डागडुजी करण्यात आली ती मॉर्डन पद्धतीने करण्यात आली आहे . छत्रपती शिवाजी महाराजांचे हे भारतातील एकमेव मंदिर असताना त्याची डागडुजी करताना त्या वास्तूचे रुप ऐतिहासिक बनविणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही तसेच मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारलेल्या भगव्या झेंड्याचीही आज दयनीय अवस्था झाली असून शिवराजेश्वर मंदिराची केलेली डागडुजी व भगवा झेंडयाची आज झालेली दयनीय अवस्था हे इतिहासाला शोभेसे नाही या झेंड्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे असेही उपरकर म्हणाले.