सावंतवाडी, दि.०४ फेब्रुवारी
जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. इयत्ता ५ वी ते ९ वी तील एस.एस.सी.बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी ‘एम.के.सी.एल. ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा २०२३ अर्थात ‘एम.ओ.एम.’ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आली होती.सदर परीक्षेसाठी राज्यभरातून २०००० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सावंतवाडीमधील सरकारमान्य एम.एस.- सी.आय.टी.केंद्र आनंदी कॉम्प्यूटर्स यांच्या विद्यमाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल निरुखेवाडीचा, इयत्ता ५ वी चा विद्यार्थी ‘कु. वैष्णव उदय सावंत’ याने सहभाग घेतला होता. त्याने जिल्हास्तर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याबद्दल या विद्यार्थ्याला शैक्षणिक भेटवस्तू , प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कामगिरीबद्दल ‘कु. वैष्णव उदय सावंत ‘ या विद्यार्थ्याचे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी कौतुक केले. तसेच, आनंदी कॉम्प्युटर्सचे संचालक श्री. मेघश्याम काजरेकर, शालेय शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.