देवगड,दि.०४ फेब्रुवारी
वीरवाडी येथील कोयंडे बंधूंच्या जयभवानी प्रासादिक भजन मंडळाचा ५१ वर्षपूर्ती सोहळा नुकताच भांडुप येथील गीता हॉल मध्ये तीन भजन सम्राटांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोयंडे पाटील सुभाष कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभाला भजन सम्राट रामदास कासले,भगवान लोकरे, ठकसेन बांदकर,पत्रकार पांडुरंग भाबल,ठकसेन कोयंडे, मुकुंद ढोके,रामदास ढोके व विजय कोयंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कासले बुवा व लोकरे बुवा यांच्या हस्ते दीप्रज्वलन व देवता पूजन करून समारंभाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी दोन्ही बुवांनी अभंग,भारुड,गौळण व जागर हे भजन प्रकार सादर करून एक भक्तिमय वातावरण निर्मिती करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यानंतर मंडळाच्या वाटचालीचा आढावा व कोयंडे आणि मित्र परिवारांचा परिचय करून देणारी चित्रमय स्मरणिकेचे मान्यवर बुवांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कै.नकुळ कोयंडे बुवांसह मंडळाचे दिवंगत मृदंगमणी,व्यवस्थापक,संचालक,सभासद व हितचिंतक या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कासले बुवा, लोकरे बुवा, बांदकर बुवा, वीरवाडीचे सुपुत्र पत्रकार पांडुरंग भाबल, मुकुंद ढोके व विजय कोयंडे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर भजन मंडळातील ज्येष्ठांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. समारंभाची सांगता बुवा ठकसेन बांदकर यांच्या सुश्राव्य अभंगवाणीने करून सर्वांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. प्रास्ताविक बुवा सदानंद कोयंडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भगवान कोयंडे यांनी आपल्या खुमासदर शैलीत केले. यावेळी समस्त कोयंडे परिवार व मित्र मंडळी तसेच हितचिंतक यांची लक्षणीय उपस्थिती होती.