ॲप डाऊनलोड करायला सांगून ९१ हजार ९ रुपयाची ऑनलाईन फसवणूक

कणकवली दि.४ फेब्रुवारी(भगवान लोके)
मोबाईलवर फोन करून ॲप डाऊनलोड करायला सांगून ९१ हजार ९ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पुनम प्रकाश कदम (२८, सध्या रा. घाटकोपर ईस्ट, मूळ रा. बोर्डवे बौद्धवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना २७ डिसेंबर २०२३ रोजी घडली.

पुनम कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भावाचा अपघात झाल्याने त्याच्या उपचारासाठी नातेवाईकांकडे पैसे मागितले होते. त्यांनी ते गुगल पे द्वारे पाठवले होते. २७ डिसेंबर रोजी पुनम कदम यांनी अकाउंट मध्ये तपासले असता पैसे दिसत नव्हते. त्यामुळे त्यांनी गुगल पे हेल्पलाइन नंबर ला फोन केला परंतु त्यांनी रिसीव्ह केला नाही. त्यानंतर सकाळी १०.३४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी मोबाईलवरील ट्रू कॉलर वर हेल्पलाइन नंबर असे नाव आले त्यामुळे तो फोन पूनम कदम यांनी उचलला. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने एव्हीव्हीएएलडीइएसके हा ॲप डाऊनलोड करायला सांगितला तसेच ॲप मधील सर्व माहिती अपडेट करण्यास सांगितली. त्यानंतर ओटीपी मागितला असता तो दिल्यानंतर ९१ हजार ९ रुपयाची फसवणूक झाली असल्याचे पुनम कदम यांना लक्षात आले असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.