सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून महिलांनी आपली आर्थिक उन्नती साधावी : सचिन वालावलकर

वेंगुर्ले,दि.४ फेब्रुवारी

शिरोडा, रेडी येथील लोकांवर दीपक केसरकर यांना नेहमीच आपुलकी आहे. भविष्यात शिरोडा रेडी मतदार संघात अनेक प्रकल्प आहेत. या ठिकाणचे प्रत्येक कुटुंब सुखी होईल यासाठी केसरलर यांचे प्रयत्न आहेत. शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी विशेष योजना आणल्या आहेत. यामुळे महिलांनी या योजनांच्या माध्यमातून आपल्या बचत गटाच्या साहाय्याने आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी शिरोडा येथे केली.
वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना रेडी जिल्हा परिषद मतदार संघ महिला आघाडी यांच्यावतीने येथील शिरोडा श्री देवी माऊली सभागृहात हळदी कुंकू कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सचिन वालावलकर बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी, उपतालुकाप्रमुख कौशिक परब, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, रेडी उपसरपंच नमिता नागोळकर, सुनील सातजी, माजी उपसरपंच रवी पेडणेकर, काशिनाथ नार्वेकर, अमित गावडे, ग्रा. प. सदस्य प्रथमेश बांदेकर, तात्या हाडये, मितेश परब, परेश मुळीक आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी सचिन वालावलकर यांची जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी व सुनील डुबळे हे वैश्य वाणी पतसंस्था सदस्य म्हणून निवडून दिल्याबद्दल त्यांचा महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या समारंभाला शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख नीता कविटकर, सावंतवाडी संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष गजानन नाटेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना सुनील डुबळे म्हणाले की, शिरोडा येथील नागरिकांवर कोणतीही संकट आली तर दीपक केसरकर सर्वप्रथम मदतीला उभे असतात. महिला आघाडीने सिंधू रत्न अंतर्गत विविध योजना महिलांपर्यंत पोचवाव्यात व सर्व महिलांनी याचा फायदा घ्यावा असे सांगितले. सिंधुरत्न योजनेतुन कुक्कुटपालन असो किंवा दुग्ध व्यवसाय यासारख्या योजनेतून महिलांच्या हाताला बळकटी देणे, बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला व्यवसाय मिळावा व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी दीपक केसरकर सातत्याने प्रयत्न करत असल्याचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी सांगितले.
आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मोठे निर्णय घेतले असल्याचे सांगत. सिंधू रत्न योजनेतून प्रत्येक महिलेला काम मिळलं पाहिजे व घरचे काम सांभाळून महिलांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी केसरकर प्रयत्नशील आहेत. व महिलांनी शिव उद्योग योजनेचाही फायदा घ्यावा असे सांगितले. मान्यवरांचे स्वागत महिला आघाडी पदाधिकारी प्राची नाईक, शीतल साळगावकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा परब यांनी केले. या कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होत्या.