मालवणच्या दिशेने भरधाव येणाऱ्या डंपरने पायी चालत जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची घटना

नागरिकांनी डंपर अडवून ठेवत डंपर चालक व मालक यांना चांगलाच प्रसाद देत पोलीसांच्या हवाली

मालवण,दि.४ फेब्रुवारी

मालवण देऊळवाडा येथे मुख्य रस्त्यावरून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव डंपरने रस्त्यावरील एका पादचाऱ्यास धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या विजय वसंत नाईक (वय ५०) (सध्या रा. देऊळवाडा मालवण) यांचा मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी डंपर अडवून ठेवत डंपर चालक व मालक यांना चांगलाच प्रसाद देत पोलीसांच्या हवाली केले. यामुळे देऊळवाडा भागात काही काळ वातावरण तंग बनले होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक डंपर मालवणच्या दिशेने येत असताना देऊळवाडा येथे मुख्य रस्त्यावर आला असता या डंपरने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या विजय वसंत नाईक यांना धडक दिली. या धडकेत विजय नाईक हे रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत डंपर अडवून धरतानाच जखमी नाईक यांना तातडीने मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर प्राथमिक उपचार सुरु असताना काही वेळेतच नाईक यांची प्राणज्योत मालवली. यामुळे अधिकच संतप्त बनलेल्या नागरिकांनी या डंपरच्या केबिन मध्ये घुसून चालकाला तसेच तेथे उपस्थित झालेल्या डंपर मालकाला देखील प्रसाद दिला. यावेळी दाखल झालेल्या पोलीसांनी या प्रकारावर नियंत्रण मिळवत डंपर चालक व मालक या दोघांनाही ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेले.

विजय नाईक यांना धडक देणाऱ्या या डंपर कोणताही पासिंग नंबर नव्हता. सदर डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत डंपर चालवत होता आसा आरोप नागरिकांनी केला. यावेळी नागरिकांनी मागाहून आलेले काही डंपरही अडवून धरले. भरधाव व अनियंत्रित डंपर वाहतुकीला पोलीस व प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

दरम्यान, या डंपरच्या धडकेत जखमी होऊन मयत झालेले विजय नाईक हे मूळ पोईप गावचे असून गेली अनेक वर्षे कामानिमित्त ते मालवण देऊळवाडा येथे आपल्या कुटुंबासमवेत भाड्याने राहत होते. त्यांच्या या दुर्दैवी निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.