छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचा लोकार्पण सोहळा  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवगर्जनेसह मोठ्या जल्लोषात पार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर उद्धव ठाकरे हे नतमस्तक झाल्यानंतर शिवरायांच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला

मालवण,दि.४ फेब्रुवारी

अवघ्या शिवप्रेमींचे दैवत असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचा लोकार्पण सोहळा आज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवगर्जनेसह मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपतींच्या मूर्तीला जिरेटोप, तीन शाल, कवड्याची माळ, दोन चवऱ्या, भगवा झेंडा प्रदान करण्यात आला.यावेळी छत्रपतींना साकडेही घालण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर उद्धव ठाकरे हे नतमस्तक झाल्यानंतर शिवरायांच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपतीना दिलेला नजराना शिवराजेश्वर मंदिराचे पुजारी श्री. श्रीराम सकपाळ यांनी स्वीकारला.

छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी राजधानी असलेल्या किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार निधीतून सिंहासन बसविले होते त्या सिंहासनाचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी त्यांच्या समवेत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, आमदार रमेश गावकर, अरुण दूधवडकर, जान्हवी सावंत, हरी खोबरेकर आदी उपस्थित होते. यावेळी शिवराजेश्वर मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ यांनी छत्रपतीं समोर उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्याविषयी साकडे घातले. यावेळी श्री सकपाळ यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या भेटीला आले आहेत लवकरच निवडणुका जवळ येतायत त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या परिपूर्ण करा तसेच ते जे काही उमेदवार उभे करतील त्यांना घवघवीत यश द्या आणि त्यांना सेवा करण्याची संधी द्या. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा आशयाचे साकडे यावेळी घातले