खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांचा अपघात होण्याची शक्यता….

संबंधित विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी…

देवगड,दि. ४ डिसेंबर

देवगड समुद्रात एका निकामी नौकेचा अवशेष तरंगत असून याचा धोका मच्छीमारांना मासेमारी करताना निर्माण झाला आहे. निकामी नौकेचा अवशेष उसळणाऱ्या लाटांमध्ये अचानक दिसून येत असल्याने त्याला धडकून मासेमारी करणाऱ्या नौकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जाळ्यांचेही नुकसान होण्याची भीती मच्छीमारांमध्ये आहे. मात्र, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

देवगड समुद्रात गेले काही दिवस निकामी बोटीचा अवशेष पाण्यावर तरंगताना मच्छीमारांना दिसत आहे. नौका निकामी झाल्याने संबंधित मालकाने त्याची योग्य विल्हेवाट न लावता त्या नौकेचे अवशेष समुद्रातच ठेवल्याने ही निकामी नौका पाण्यावर तरंगत किनाऱ्यापासून काही अंतरावर जाऊन पोहोचली आहे. नौकेचे अवशेष हे पाण्यावर उपडी अवस्थेत असून उसळणाऱ्या लाटांमध्ये नौकेचा अवशेष काही वेळा अचानक निदर्शनास पडतो. तर काही वेळा नजीक गेल्यानंतरच ते नौकेचे अवशेष निदर्शनास येतात. त्यामुळे त्या भागात समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांना या निकामी नौकेच्या अवशेषांचा धोका निर्माण झाला आहे. मासेमारी करताना तरंगणाऱ्या निकामी नौकेच्या अवशेषांचा मच्छीमारांना अंदाज न आल्यास त्या अवशेषांना धडकून नौकांचा अपघात होण्याची तसेच जाळ्यांचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे संबधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक मच्छीमारांमधून होत आहे.