वैभव नाईक यांना कोणी रसद पुरवली हे धोंडी चिंदरकर यांना माहित आहे तर त्यांनी नाव जाहीर करावे

शिवसेना (शिंदे गट ) तालुकाप्रमुख महेश राणे यांचे उघड आव्हान

मालवण,दि.०५ डिसेंबर
विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निलेश राणे विजयी झाले. हा विजय निलेश राणे यांच्या विकासाच्या व्हिजनचा होता. महायुतीचे नेते, कार्यकर्ते यांनी एकसंघ केलेल्या कामाचा आहे. काही ठिकाणी मताधिक्य कमी झाले. त्याचा आढावा पक्षाच्या माध्यमातून घेतला जात आहे असे असताना पराभूत उमेदवार वैभव नाईक यांना निवडणुक काळात कोणीतरी रसद पुरवली. त्यांची ताकद वाढवण्यात आली. निलेश राणे यांचा पोलिटिकल एनकाउंटर करण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारचे वक्तव्य भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले आहे जर चिंदरकर यांना माजी आमदार नाईक यांना कोणी रसद पुरविली व इतर सगळ्या गोष्टी माहित असतील तर त्यांनी त्या व्यक्तींची नावे जाहीर करावीत असे उघड आव्हान शिवसेना (शिंदे गट ) मालवण तालुकाप्रमुख महेश राणे यांनी देत अर्धवट वक्तव्य करून जनतेत आणि महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न श्री चिंदरकर यांनी करू नये असा टोलाही लगावला आहे

भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषद घेत निलेश राणे यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या कमी मताधिक्याबाबत वक्तव्य करताना वैभव नाईक यांना कोणीतरी मसल पॉवर पुरविल्याचा आरोप करीत सनसनाटी निर्माण केली होती त्याला शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांनी आज जोरदार प्रत्युत्तर देत आव्हान दिले

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री राणे यांनी म्हटले आहे की, मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयानंतर जल्लोष होत असताना नेते मंडळींना कार्यकर्ते हे विजयाचे श्रेय देत असतात. राणे कुटुंब आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांना विजयाचे श्रेय आहेच. सोबतच महायुतीचे नेते मंडळी, कार्यकर्ते हे सर्वच विजयाचे शिल्पकार आहेत. “किंगमेकर” आहेत. “गेम चेंजर” आहेत. अश्या अनेक उपाध्या दिल्या जाऊ शकतात. तसेच त्याबाबत कुठे मीडियात काय येते? हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असल्याचे श्री राणे यांनी म्हटले आहे

श्री राणे यांनी पुढे म्हटले आहे की, कोणी कोणाला रसद पुरवली. विरोधकांना पैशाचे वाटप करून मते फिरवली. मताधिक्य घटवण्याचा प्रयत्न झाला. यां मुद्द्याचा चिंदरकर यांनी खुलासा करून ज्या उबाठा कार्यकर्ते यांना कोणी रसद पुरवली त्यांचीही नावे जाहीर करावीत. आमचे नेते आमदार निलेश राणे स्वतःच्या हिंमत्तीवर विजयी झाले. हा विजय महायुतीचा व जनतेचा आहे तसेच राणे कुटुंबियांच्या नेतृत्वाचा आहे. असे असताना धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची टीका करून श्री राणे यांनी वैभव नाईक यांना रसद पुरवली गेली असे चिंदरकर यांचे म्हणणे असेल तर त्याबाबत त्यांनी पुर्ण खुलासा करावा. असलेल्या पुराव्यासह नावे जाहीर करावीत. म्हणजे वरिष्ठ नेते त्यावर योग्य तो निर्णय घेतील

आगामी नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता धोंडी चिंदरकर यांची अर्धवट भुमिका महायुतीला अडचणीची ठरावी अशी असून अविश्वास निर्माण करणारी आहे. निवडणुकीत एकसंघ झालेल्या कामाला छेद देणारी चिंदरकर यांची भुमिका असून यावर त्यांनी खुलासा द्यावा असेही महेश राणे यांनी म्हटले आहे