सावंतवाडी दि.६ डिसेंबर
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी च्या वतीने सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष व जेष्ठ समाजवादी दिवंगत नेते दत्ताराम वाडकर यांनी श्रीराम वाचन मंदिर कडे कायमस्वरूपी ठेवलेल्या ठेव रकमेच्या व्याजातून दरवर्षी पूज्य साने गुरुजी जयंती (२४ डिसेंबर) निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे २९ वे वर्ष आहे.
सदर स्पर्धा मंगळवार दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत गट पहिला इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम पारितोषक २५० रुपये, द्वितीय २०० रुपये, तृतीय १५० रुपये ठेवण्यात आले आहे. गट दुसरा इयत्ता आठवी ते दहावी प्रथम पारितोषिक ३०० रूपये ,द्वितीय २५० रूपये ,तर तृतीय २०० रुपये ठेवण्यात आले आहेत. स्पर्धा सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित आहे. जिल्हा परिषद शाळानाही या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल.
या स्पर्धेसाठी कोणत्याही संस्कारक्षम कथेची निवड करावी. स्पर्धकाला पाच मिनिटे वेळ दिला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धा आटोपल्यावर त्या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होईल. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून दोनच स्पर्धक विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. स्पर्धकांची नावे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर पर्यंत स्वीकारले जातील असे श्रीराम वाचन मंदिर कार्याध्यक्ष अँड संदीप निंबाळकर व कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी म्हटले आहे.