देशाची वाटचाल मोदींनी हुकुमशाहीकडे चालवली आहे – उद्धव ठाकरे..

दिल्लीसह महाराष्ट्रात भगवा झेंडा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही ;कणकवलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची जाहीर सभा

कणकवली दि.५ फेब्रुवारी(भगवान लोके)

भाजपला सत्तेत आणण्यासाठी आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. अनेक राज्‍यात आणि केंद्रात भाजप सत्तेवरही आली. पण भाजपच्या नेत्‍यांनी मूळ भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना, नेत्‍यांना बाजूला करून इतर पक्षातील गुंडांचा भाजपमध्ये भरणा केला आहे. एकीकडे अबकी बार चारशे पार अशा घोषणा दिल्या जातात. तर दुसरीकडे विरोधातील पक्ष फोडले जात आहेत. देशाची वाटचाल मोदी शहा यांनी हुकुमशाहीकडे चालवली असल्याचा घणाघाती टिका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

कणकवलीत उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जाधव, उपनेते गौरीशंकर खोत,संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संदीप कदम,शैलेश भोगले, अतुल रावराणे, डॉ.प्रथमेश सावंत,
राष्‍ट्रवादीचे अनंत पिळणकर, वंचित तर्फे महेश परुळेकर आदी उपस्थित होते.

आता तर दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केव्हाही अटक होण्याची शक्‍यता आहे. पण ज्‍यावेळी भाजपची सत्ता जाईल त्यावेळी सर्व तपास यंत्रणा तुमच्याच पाठीशी लागतील याचेही भान मोदी, शहांनी ठेवावे.त्यामुळे जनतेने आता आगामी लोकसभा निवडणुकीत रोखले पाहिजे.नाहीतर तुमच्यासह तुमच्या पुढील पिढ्यांना गुलामगिरीची वेळ येईल अशी भीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्‍ट्रात दौरे वाढले आहेत. मात्र प्रत्‍येक दौऱ्यात ते महाराष्‍ट्रातील प्रकल्‍प गुजरातला पळवून नेत आहेत. तुम्‍हाला गुजरात समृद्ध करायचा असेल तर तो करा, त्‍याला आमचा विरोध नाही. पण इथले प्रकल्‍प पळवून गुजरातचं भलं करू नका. नुकताच मोदींनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. ते नौदल दिनासाठी सिंधुदुर्गात आले असले तरी त्‍यांनी इथला पाणबुडी प्रकल्‍प गुजरातला पळवला,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मुंबईत गँगवॉर फोफावलं होतं. कुणीही कुणाला गोळ्या घालत. मात्र आपल्या युती सरकारने ते गँगवॉर मोडून काढलं होतं. आता दुर्दैव असं आहे की, या सरकारमध्येच गँगवॉर सुरु झालंय. एक मिंधेंची गँग, एक भाजपाची गँग, तिसरी गँग दिसतच नाही, पण ती आहे कारण ती ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात अडकली आहे. त्यामुळे त्या गँगला डोकं वर काढता येत नसल्याचा टोला श्री .ठाकरे यांनी लगावला.

भाजपमध्ये मर्दपणा नाही,तोमर्दपणा रक्‍तात असावा लागतो.त्‍यामुळे इडी, सीबीआय व इतर तपास यंत्रणा मागे लावून ते सर्व विरोधी पक्ष संपवायला निघाले आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर या तपासयंत्रणा बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जा आमचे शिवसैनिक तसेच राज्‍यातील, देशातील जनता तुम्हाला पायदळी तुडविल्‍याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

भाजपची मंडळी जय श्रीराम म्हणत हिंदुत्वाच्या मोठ्या बाता करत आहेत. आम्‍हीही हिंदू आहोत. आमचं हिंदूत्‍व घराघरामध्ये चूल पेटवणारं आहे. तर भाजपचं हिंदूत्‍व संपूर्ण घर पेटवून देणारं आहे. त्‍यामुळे आजच्या कणकवलीच्या सभेत मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित राहिले आहेत.आमचा लढा देशातील हुकुमशाही विरोधात आहे. त्‍यामुळे इथल्‍या कोंबडीचोराबाबत काही बोलायचं नाही. त्‍याचरोबर आम्‍हाला भाजपची मंडळी ज्‍या शिव्या घालतील, त्‍याच शिव्या तुम्‍ही भाजपच्या वरिष्‍ठ नेत्‍यांपासून खालच्या नेत्‍यांची नावे घालून द्या. म्‍हणजे शिव्या काय असतात हे भाजपा नेत्यांना समजेल,असे श्री.ठाकरे म्हणाले.

खा.विनायक राऊत म्हणाले,भाजपाने काही जणांना भुंकण्यासाठी नेमलेल्या लोकांमध्ये एकजण कणकवलीत आहे.रोज उठून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत आहे.या राणेंनी लोकांना लुबाडले आहे. नारायण राणेंनी मंत्रिपदाचा उपयोग कोकणासाठी केला नाही.शासकीय मेडिकल कॉलेज होताना अनेक अडथळे आणले.शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये मोफत प्रवेश असल्याने गरीब मुले डॉक्टर होवू शकतात.पण तोच प्रवेश राणेंच्या मेडिकल कॉलेज मध्ये घेण्यासाठी १ कोटी मोजावे लागतात,अशी टीका खा.विनायक राऊत यांनी केली.

जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर म्‍हणाले , राणेंचा दोन वेळा जनतेने पराभव केला. तरीही त्‍यांच्यात खुमखुमी असेल तर राणेंनी लोकसभा लढवावी इथली जनता राणेंच्या पराभवाची हॅटट्रीक केल्‍याशिवाय राहणार नाही.

शिवसेना नेते आ.भास्कर जाधव म्हणाले, मी कोंबडी वर बोललो,सुष्म, लघु वर बोललो.हा नाऱ्या पदासाठी दारोदार भिक मागत फिरेल,हा बाळासाहेब ठाकरे यांचे शाप आहेत.त्यावेळी मला मंत्री असताना बाळासाहेब बोलले होते,तसच आज घडत आहे.शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी,नागोबा दुसरा मुख्यमंत्री झाला. मग ,उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर काय चुकले?तुम्हाला वाईट का वाटले?जोपर्यंत सन्मानाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसवत नाही,तोपर्यंत शांत बसायचे नाही.भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केला,हा भाजप पक्ष आहे.

आमदार वैभव नाईक म्‍हणाले, खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही हीच ठाकरेंच्या शिवसेनेची खरी ताकद आहे. आम्‍ही अडीच वर्षात काय केलं हे विचारता. पण केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह ४ मंत्र्यांनी, भाजपच्या मंडळींनी गेल्‍या तीस वर्षात काय केले.
या सभेला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.गौरीशंकर खोत,सतीश सावंत, अतुल रावराणे,संदीप कदम,नीलम पालव सावंत यांनी मार्गदर्शन केले.