कणकवली तालुक्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 350 बंधारे पुर्ण

कणकवली पंचायत समितीचे 1 हजार बंधाऱ्यांचे उद्दीष्ट; 4 व 5 डिसेंबर रोजी गावागावांत बंधारे बांधण्यासाठी विशेष मोहीम

कणकवली ,दि.०७ डिसेंबर

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी कच्चे, वनराई बंधारे बांधून पाणी अडविले जाते. यावर्षी कणकवली तालुक्याला एक हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून पंचायत समितीच्या माध्यमातून 4 व 5 डिसेंबर हा बंधारा दिवस साजरा करण्यात आला. यात तालुक्यात दोन दिवसांत 350 बंधारे बांधण्यात आले.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 4 व 5 डिसेंबर रोजी गावागावांत बंधारे बांधण्यात आले. नागवे येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी, मंगेश वालावलकर, कक्ष अधिकारी अनिल चव्हाण, मनीषा देसाई, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, राजू शिंदे, प्रमोद ठाकुर, विठ्ठल ठाकुर, प्रथम जाधव, संजय कवठकर, शाखा अभियंता गणेश कडुलकर, विनायक चव्हाण तसेच सरपंच, उपसरपंच, स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

यावर्षी कणकवली तालुक्याला 1 हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यात नियोजन करण्यात आले असून दोन दिवसांत 350 बंधारे बांधण्यात आल्यानंतर पुढील 8 दिवसांत हे बंधारे पूर्ण करण्याबाबतचे नियोजनही आहे.