आंबोली घाट रस्त्यामध्ये तब्बल ४० कोटी पेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार !

अधिकाऱ्यांची प्रॉपर्टीसह खातेनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा- माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर 

सावंतवाडी,दि.५ फेब्रुवारी 
आंबोली घाट रस्त्यामध्ये तब्बल ४० कोटी पेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून यावर देखरेख ठेवणारे बांधकाम अधिकारी गब्बर झालेले आहेत,अशा संबंधित अधिकाऱ्यांची प्रॉपर्टीसह खातेनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पुन्हा एकदा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी कामाच्या तपशीलासह काही पुरावे ही सादर केले.

आंबोली घाट रस्त्याच्या भ्रष्टाचाराबाबत माजी नगराध्यक्ष श्री साळगावकर यांनी बांधकाम विभागाकडे यापूर्वी मागणी करताना रस्त्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारामुळे रस्ता अपघातात अनेकांचे बळी गेले त्यामुळे संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती दरम्यान आज पुन्हा एकदा त्यांनी बांधकाम चे कार्यकारी अभियंता श्री किणी यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे विलास जाधव सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर आदी उपस्थित होते.
श्री साळगावकर म्हणाले, आंबोली घाट रस्त्या वर २०१० ते २०१४ या कालावधीमध्ये झालेल्या शासकीय निधीच्या खर्चाची व संबंधित कामाची माहिती मागत या कामावर ज्या संबंधित अधिकाऱ्यांची देखरेख होती त्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली या कालावधीमध्ये तब्बल ४० कोटी चा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही यावेळी श्री साळगावकर यांनी केला.

मागितलेल्या कामाच्या तपशिलामध्ये रस्त्याच्या नुतनीकरणासाठी झालेला खर्च कठड्यांवर झालेला खर्च आपत्कालीन व्यवस्थेवर झालेला खर्च प्रवास भत्त्यावर झालेला खर्च आदी विविध गोष्टींबाबत त्यांनी माहिती मागवली आहे.
यावेळी चर्चेदरम्यान आंबोली फणसवाडी रस्त्यावर ४० लाख रुपये खर्च करून ब्रिज बांधण्यात आले आहे परंतु या ब्रिजची डिझाईन चुकीच्या पद्धतीने केल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत हे ब्रिजच्या अधिकाऱ्यांच्या अधिकरी ठिकाणी झाले त्यांची ही चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली तर महादेव पॉईंट हिरण्यकेशी चौकुळ आदी भागातील रस्त्याची उखाणे ही चुकीच्या पद्धतीने झाल्याने रस्ते खराब झाल्याचे पुरावे ही त्यांनी सादर केले. बावळट या ठिकाणी बांधलेल्या ब्रिजचे रेलिंग संबंधित ठेकेदाराने काढून स्वतःच्या घरी नेऊन ठेवले आहे तर कोणालाही फायदा नाही अशा पद्धतीने साकव याच भागात उभारण्यात आला आहे त्यावर एक लाख रुपये उधळण्यात आले आहे यासंबंधी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्याची ही चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास प्रसंगी न्यायालयातही दाद मागू असे सांगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या काही गोष्टीबाबत आपण जातीनिशी लक्ष घालणार आहोत तसेच संबंधित कामाची चौकशीही करणार आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम झाले आहे त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन पाहणी करणार आहे जो कोण अधिकारी यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई निश्चितच होणार आहे आपल्या अखत्यारित जो विषय येत नाही त्याबाबत आपण वरिष्ठाचे लक्ष वेधणार असल्याचे श्री किणी म्हणाले.

अधिकाऱ्यांच्या गोव्यात प्रॉपर्टी..
आंबोली घाट रस्ता तसेच परिसरातील कामांमध्ये कोट्यावरीचा भ्रष्टाचार करून संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांनी गोव्यात प्रॉपर्टी घेतले आहेत शिवाय हे अधिकारी जीवाची मजा करण्यासाठी पनवेल सारख्या ठिकाणीही दिसून येत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय प्रॉपर्टी सहित चौकशी व्हावी असे मागणी बबन साळगावकर यांनी केली.