विकास धोरणात ‘व्हिजन वेंगुर्ला‘ची भूमिका निर्णायक ठरणार

मुंबईस्थित स्नेहसंवाद कार्यक्रमात वेंगुर्लेकरांचा निर्धार

वेंगुर्ला ,दि.५ फेब्रुवारी

वेंगुर्ल्याच्या विकास धोरणात ‘व्हिजन वेंगुर्ला‘ची भूमिका निर्णायक आणि तितकीच महत्त्वाची ठरणार असल्याचा निर्धार मुंबईस्थित वेंगुर्लेकरांनी केला. मुंबईत आयोजित केलेल्या विशेष स्नेहसंवाद कार्यक्रमात हा निर्धार करण्यात आला.

‘स्नेहसंवाद वेंगुर्लेकरांशी‘ अंतर्गत व्हिजन वेंगुर्ला ‘धोरण वेंगुर्ल्याचे, तोरण उत्कर्षाचे‘ हा विशेष कार्यक्रम दादर येथील वनमाळी सभागृहात पार पडला. यावेळी ओळख आपल्या वेंगुर्ल्याची आणि वेंगुर्लेकरांच या पहिल्या सत्राने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर आपल्या आठवणीतील वेंगुर्ले या सत्रामधून सर्वांनी आपल्या गत आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर देशविदेशातील वेंगुर्लेकरांचा शुभेच्छा संवाद पार पडला. तत्पूर्पी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, अभिनेते दिगंबर नाईक, लेखक दिग्दर्शक व अभिनेते राजेश देशपांडे आणि अभिनेता अंशुमन विचारे या सेलिब्रिटीच्या शुभेच्छांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी ‘व्हिजन वेंगुर्ल्याचे, आपल्या भवितव्याचे‘ आणि ‘माझे वेंगुर्ले माझी जबादारी‘ या दिलखुलास संवाद विशेष चर्चेत सर्व निमंत्रितांनी सहभाग घेतला. दरम्यान वेंगुर्लेच्या विकास धोरण विषयानुरूप सर्वच क्षेत्रांचा यात आढावा घेताना मूलभूत आणि भविष्यातील वाटचालीवर प्रकाशझोत टाकण्यात आला. सोबतच ‘व्हिजन वेंगुर्लाची‘ भूमिका निर्णायक आणि तितकीच महत्त्वाची ठरावी असा ठराव यावेळी एकमताने करण्यात आला. या सत्राचे निवेदन मिलिंद परब आणि कृष्णदर्शन जाधव यांनी केले. यावेळी अभिनेता रोहन पेडणेकर यांच्या हस्ते ‘व्हिजन वेंगुर्लाचा‘ लोगोचे निर्माते स्वप्नील रेडकर यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन पेडणेकर यांनी केले. तर स्वागत गोपाळ म्हापणकर यांनी, प्रास्ताविक कृष्णदर्शन जाधव यांनी आणि संगिता धुरी-परब यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून उपस्थित राहिलेल्या बहुसंख्य वेंगुर्लेकरांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.