तालुक्यातील एका प्रथितयश बागायतदाराला तब्बल ५२ लाख १३ हजार ५०० रुपयांचा ऑनलाईन गंडा

देवगड, दि.१२ डिसेंबर 
तालुक्यातील एका प्रथितयश बागायतदाराला तब्बल ५२ लाख १३ हजार ५०० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २१ नोव्हेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकार आहे. फेसबुकमधून शेअर मार्केटच्या एका खोट्या जाहिरातीच्या आमिषाला बळी पडल्यानंतर फसव्या वेबलिंकद्वारे व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून हा सगळा प्रकार घडला आहे. संबंधित बागायतदाराने याबाबत देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका बागायतदाराने फेसबुक हाताळताना पे-टीएमचा लोगो वापरून शेअर मार्केटसंबंधित एक जाहिरात वाचली. या जाहिरातीच्या वेबलिंकद्वारे त्याने शेअर मार्केटचा एक ग्रुप जॉईन केला. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये शेअर मार्केटमधून चांगल्या उत्पन्नाच्या विविध ऑफर्सची माहिती देण्यात आली. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी बागायतदाराने शेअरमार्केटच्या त्या व्हॉटस् ग्रुपमधूनच चौकशी केली असता त्याला एक मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची सूचना करण्यात आली. बागायतदाराने अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर स्वतःचा लॉगिन आयडी तयार करून प्रोफाईल तयार केली. त्यानंतर व्हॉटस्अप ग्रुपद्वारे शेअर्स मार्केटच्या आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळविण्यासाठी त्या बागायतदाराने ग्रुपमधील अज्ञात संशयितांकडून दिल्या गेलेल्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएस, एनईएफटीद्वारे पैसे भरणा करण्यास सुरुवात केली. या पैशांमधून मिळणारा लाभ संशतियांकडून संबंधित बागायतदाराच्या अॅप्लिकेशन आयडीद्वारे आभासी पद्धतीने दाखविण्यात आला होता. या लाभाची रक्कम अॅप्लिकेशनमध्ये सुमारे १४ कोटी असताना बागायतदाराने त्यातील २१ लाख रुपये काढण्यासाठी अॅप्लिकेशनमधून रिक्वेस्ट सबमिट केली. मात्र, ही रिक्वेस्ट विविध कारणे दाखवून फेटाळण्यात आली व काही वेळातच बागायतदाराचा अॅप्लिकेशन लॉगिन आयडीही बंद करण्यात आला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बागायतदाराच्या लक्षात येताच त्याने देवगड पोलीस स्थानक गाठत फिर्याद दाखल केली. घटनेचा तपास देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर करीत आहेत.
दरम्यान, अश्या प्रकारची ऑनलाईन फसवणूक झाल्यास 1930 या क्रमांकावर तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.