संतप्त धरणग्रस्तांनी अरुणा धरणाच्या कालव्यासह अन्य कामे सोमवारी सकाळपासून बंद

जोपर्यंत आमच्या न्याय मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत धरणाच्या संबंधित कोणतेही काम करु देणार नाही

वैभववाडी,दि.५ फेब्रुवारी
हेत किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणातील पिण्याच्या पाण्यासह इतर समस्यांकडे वारंवार लक्षवेधूनही पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त धरणग्रस्तांनी अरुणा धरणाच्या कालव्यासह अन्य कामे सोमवारी सकाळी ११ वा.पासून बंद पाडले आहे. जोपर्यंत आमच्या न्याय मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत धरणाच्या संबंधित कोणतेही काम करु देणार नाही. असा इशारा  धरणग्रस्तांनी दिला आहे.
अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील  आखवणे येथील १६५ धरणग्रस्त कुटुंबांचे हेत किंजळीचा माळ येथे शासनाने पुनर्वसन केले आहे. सन २०१९ साली धरणाची घळभरणी करण्यासाठी युध्द पातळीवर पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी पुनर्वसनातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले होते. माञ पाच वर्षे होत आली तरी हेत किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणातील अनेक कामे अपूर्ण आहे. यासाठी वारंवार जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यांना समस्या बाबत पञव्यवहार करण्यात आला. माञ प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे धरणग्रस्तांना प्रशासनाच्या दारोदारी हेलपाटे मारावे लागत आहेत. धरणग्रस्तांनी स्वतः चे घरदार, जमिन जागा प्रकल्पासाठी देऊन मोठा त्याग केला आहे. त्यांच्यावरच न्याय  मागण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे.
पुनर्वसन गावठाणाच्या नळयोजनेसाठी विहीर मारण्यात आली आहे. या विहीरीचा ताबा पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्तांना मिळावा. अशी मागणी केली जात आहे. माञ संबंधित विहीर ही तुमच्यासाठी नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. जर ही विहीर पुनर्वसन गावठाणासाठी नाही तर या विहीरीवर करण्यात आलेला लाखो रुपयाचा निधी कसा काय खर्च करण्यात आला. असा सवाल धरणग्रस्तांकडून केला जात आहे. तर पुनर्वसन गावठाणासाठी स्वतंत्र विहीर मारण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहे. माञ यावर अदयाप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. नळयोजनेच्या वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे धरणग्रस्तांना पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे. गेले आठ दिवस पुनर्वसन गावठाणातील नळयोजनेला पाणी आलेले नाही.
पाञ लाभार्थ्यांना अदयाप भूखंड मिळालेले नाहीत. त्यांना भूखंड मिळावे. मिळालेल्या भूखंडाची ताबा पावती व सात बारा मिळावे. संरक्षक भिंत बांधण्यात यावी. स्मशानभूमी ही अंगणवाडीला लागून आहे. ती ५० फूट मागे घ्यावी. तसेच पुनर्वसन गावठाणातील अंगणवाडी चालु करावी. अशा मागण्या धरणग्रस्तांकडून करण्यात येत आहेत. या समस्या सोडविण्याचे पाटंबधारे विभागाकडून आश्वासन देण्यात आले आहे. माञ यावर कोणतीच कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे संतप्त धरणग्रस्तांनी धरणाचे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत धरणाचे काम करु देणार नाही. असा इशाराही धरणग्रस्तांनी दिला आहे. यावेळी  माजी सरपंच सुरेश नागप, महादेव नागप,शिवाजी पडीलकर,सुनिल नागप, मानाजी घाग , परशुराम पडीलकर, विनोद नागप, विजय नागप, यांच्यासह किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील धरग्रस्त उपस्थिती होते.