तळेरे,दि.५ फेब्रुवारी
आपल्या मैत्री परिवाराच्या यावर्षीच्या चौथ्या गेट टुगेदरला नक्की येणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघच होती. म्हणजे मी माझ्या मनाशी केलेला दृढ संकल्पच होता. आपली इच्छा शक्ती प्रबळ असेल आणि ठाम विश्वास असेल…सोबत नेहमीच सकारात्मक विचार अन् सकारात्मक दृष्टीकोन असेल तर त्यातून आपल्याला मार्ग हा निश्चितच सापडतो. असं माझे मन मला सांगत होते अगदी तसाच काहीसा अनुभव यावेळी मला प्रत्ययास आला. त्याचीच प्रचिती वेळोवेळी येत होती.माझ्यातील आत्मविश्वास मला स्वस्थ बसू देत नव्हता…आणि आपल्यातील निव्वळ मैत्री पोटी इथपर्यंत एकटी येण्यासाठी सर्व उर्जा शक्ती यावेळी मैत्री परिवारामुळेच प्राप्त झाली.
गेली तीन वर्षे गेट टुगेदरला न आलेल्याचे शल्य मला माझ्या मनाला सतत टोचत होते. प्रत्येक वेळी काही ना काही कारण व्यत्यय,अडचणी,कुटुंबाची जबाबदारी अंगावरती पडल्याने इच्छा असूनही येऊ शकत नव्हते. तुम्हा सर्वांचा मित्र शशिकांत नारकर आर्मी मध्ये बाहेर गावी असल्याने त्याला मनाप्रमाणे सहजासहजी सुट्टी मिळणे अशक्य असल्याने त्याला येणे शक्य नव्हते. पण मला स्वतःला येता येणे शक्य नसले तरी तुला मात्र ह्यावेळी जावेच लागेल असा त्यानेच आग्रह धरला होता. माझी तर यायची प्रबळ इच्छा होती. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी संजय खानविलकर या मित्राने अगदी ठामपणे लिहिले होते की, यावर्षीच्या गेट टुगेदरला योगगुरू दीपा नारकर आली नाही तर यापुढे कधीच तिला येण्याचा आग्रह करणार नाही. मग माझ्या मुलांनीही मला जाण्याची परवानगी दिली. आमची तू काहीएक काळजी करू नकोस,आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करु तू बिनधास्त जा.
मग काय पडत्या फळांची आज्ञा…..लगेच मी जोमाने गेट टुगेदरला येण्याच्या तयारीला लागले. मला सत्तावीस वर्षांनी सर्व मित्रमैत्रिणींना भेटण्याचा दुर्मिळ योग घडणार होता. निव्वळ या एका गोष्टीमुळे मी खूप आनंदून गेली होती. मग कोण कोण मैत्रीणी येणार आहेत याची काहीच कल्पना नव्हती. समीताचा फोन आला की यावेळी येणार आहेस ना दीपा? यावेळी लगेचच मी तिला माझा होकार दिला. संजय आणि महेंद्र या दोघांनाही मॅसेज करून येणार असल्याचे कळविले होते. मग काय इतक्या वर्षांनी माझ्या काॅलेज जीवनातील मैत्रीणी भेटणार याचा आनंद मनोमनी तर होताच पण तितकीच उत्सुकताही मनाला लागून राहिली होती.मग समजले की माझ्या काही मैत्रीणी येऊ शकणार नाहीत.त्यामुळे थोडी हिरमुसली होऊन वाईट वाटले.पण बाकीच्या तरी मैत्रीणी भेटील, त्यांच्या सोबत राहण्याची संधी मिळेल.मग ठरले संजयला मी येणार असल्याचे कन्फर्मेशन दिले.मी सर्व मित्रमैत्रिणींना योगा शिकविणार हा मनाशी निश्चय केला.मग एकंदरीत कार्यक्रम कसे असणार इत्यादी प्रश्न पडू लागले. त्यामुळे अजूनच उत्सुकता वाढली, मग काय एकदाचे नियोजन समजले व मी येण्याच्या तयारीला लागले.आणि मी त्यासाठी सकाळीच गावी येऊन पोहोचले देखील.
शनिवारी सकाळी माझ्या भावाने मला कणकवलीतील सर्व जण भेटण्याच्या ठिकाणी सोडले.तिथे स्वागताला मैत्री परिवाराचा कुटुंब प्रमुख महेंद्र सांबरेकर व इतर मित्रमैत्रिणी अगोदरच उपस्थित होत्या.काहींना तर मी ओळखूच शकत नव्हते. अर्थात एवढ्या वर्षाचा फरक आणि बऱ्याच जणांमध्ये खूप बदल झालेले होते.हळूहळू सर्व जण आल्या वरती भेट होत गेली.माझ्या मैत्रीणी वैशाली,सुरेखा,रत्नप्रभा,प्रफुल्लता,गीता,मनिषा,अर्चना या सर्वांसोबत गळाभेटी झाल्या.सर्वजण जमा झाल्यावरती नियोजीत गाड्यामध्ये कुटुंब प्रमुख महेंद्र सांबरेकर याने सर्वांना एकत्रित केले आणि गा-हाणे घालून श्रीफळ वाढविले.त्यानंतर सर्व जण गाड्यामध्ये बसून नियोजित ठिकाणाच्या दिशेने सर्व गाड्या मार्गस्थ झाल्या.गाड्यांमधून जातेवेळी आम्ही खूप गप्पा,चेष्टा मस्करी करीत,फोटो काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकदाचे नियोजित ठिकाणी पोहचलो.अन् ते नयनरम्य अथांग सागर स्थळ पाहताच क्षणी मंत्रमुग्ध व्हायला झाले.ज्यांनी हे ठिकाण निवडले त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद.
गेट टुगेदरचे आयोजन आणि नियोजन नीटनेटके आणि अतिशय छान होते. तिथे गेल्यावर सर्व ठरल्याप्रमाणे मुलींसाठी स्वतंत्र रुमची व्यवस्था करण्यात आली होती. नंतर इतक्या वर्षांनंतर सर्व मित्रमैत्रिणींना भेटून मनोमनी खूप आनंद झाला.दुपारच्या जेवणानंतर काही वेळाने तयार होऊन थोडेसे संध्याकाळच्या कार्यक्रमाबाबत विचारविनिमय करून तसे नियोजन केले.सरिताने अगदी कमी वेळेत नाच रे मोरा…या बाल गीता वरील डान्सचा सराव घेतला.नाच करतांना अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.त्यानंतर कांदळवन बोटिंग सफरीचा अनुभव सर्वात भारी वाटले. नयनरम्य ठिकाण,सुंदर खाडी,कांदळवन बेट,अथांग सागर,सुर्यास्त सर्वच भारी होते.डोळ्यात सर्व क्षण साठवून, मोबाईलच्या कॅमेरात कैद करत गेले.खूप फोटो सेशन्स केले.नंतर मंगेश वाळिंबेच्या कॅमेरा तर सर्वत्र होताच. आम्ही मैत्रीणींनी हव्या त्या पोझिशनमध्ये मनसोक्त फोटो काढण्याची हौस पूर्ण केली. त्यानंतर वडापाव, कांदा भजी वरती यथेच्छ ताव मारला.
मग पुढील कार्यक्रमासाठी तयारी करून उद्घाटन सोहळा, पहिल्यांदाच आलेल्या मित्रमैत्रिणींची ओळख, मी माझी ओळख योगगुरू अशी करून देताच मोठी योगिनी असल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली.वाढदिवसानिमित केक कापून शुभेच्छा दिल्या आणि मैत्री भेट म्हणून मोगऱ्याचे फुलाचे रोपटे देण्यात आले. मला शंखनाद करण्याची संधी मिळाली त्यामुळे धन्य पावले.
ठरल्याप्रमाणे प्रमाणे एका पाठोपाठ एक कार्यक्रम सुरू झाले.जसा एखादा कुटुंबातील सार्वजनिक सोहळाच वाटत होता.गाणी,नाच,योगानृत्य,विविध सुरेल स्वरात गाणी गाणाऱ्या मित्रमैत्रिणी पाहून मी दंग झाले.त्यानंतर रात्रीचे जेवण आणि दशावतारी नाटकाचा राजेशाही थाट हे सर्व कार्यक्रम जसजसे होत होते तसे माझे बॅगभर आणलेले ढीगभर कपडे खाली होत होते. त्यावेळी खूप उत्साहाच्या भरात मी बरेच भीष्म पराक्रम केले होते.अती उत्साहाने योग नृत्य करतांना गडबडीत उलटाच घातलेला टीशर्ट …..नंतर हरविलेली माझ्या कानातील मोती सोन्याची कर्णफुले ….एक आठवणीतील प्रसंग नाच रे मोराच्या…बालगीतावरील डान्स…विठ्ठल..विठ्ठल गाण्यावरती ताल धरतांना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या पण खूप मजा आली.सर्व मित्रमैत्रिणींना बालपणात गेल्याचे फिल आले.सर्वांना आनंदी पाहतांना खूप छान वाटले.
त्यानंतरच्या दशावतारी नाटकातील सर्व मित्र, त्यांच्या भूमिका,त्यांची वेशभूषा,केशभूषा,रंगभूषा,संवाद आणि मुख्य म्हणजे अप्रतिम अभिनय कौशल्य,हाडाचे कलाकार…विशेष म्हणजे यातील एकाही पात्राला आम्ही ओळखूच शकलो नाही.जेव्हा त्यांच्या तोंडातून संवादात्मक शब्द बाहेर पडले तेव्हा समजले की हा आपला…मित्र आहे तो.त्यांना उत्तम संगीत साथ देण्यारे पेटी,ढोलकी,झांज वादक मित्र त्यांचे देखील मनापासून कौतुक.अरे मित्रांनो सर्व गुण संपन्न तुमच्यात दडलेले हे कलागुण पहायला मिळाले. असा मित्रपरिवार आणि अशी मैत्री कुठेच शोधून सापडणार नाही. शंकर गोसावीच्या पत्नीने हुबेहूब स्त्री पात्र साकारण्यासाठी घेतलेली मेहनत कामी आली.त्याबद्दल तिचे कौतुक आणि अभिनंदन. त्याचे अभिनय कौशल्य आणि गाणी,संगीत याची लयबद्धता त्यामुळे ते नाटक व्यावसायिक नाटकाला लाजवेल असे होते.
खरं तर ते नाटक पाहतांना मुख्य म्हणजे युद्धाचा प्रसंग पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण आली. माझे बालपण वेंगुर्ल्यातच गेलेले, त्यात जत्रांमध्ये हे दशावतार आम्ही पाहयचो व दुसऱ्या दिवशी लहान भावाबरोबर पट्टीने युद्ध करायची तो प्रसंग मला आठवला.पण असो हे नाटक पाहताना कलाकारांनी घेतलेली मेहनत अप्रतिम होती. त्यामुळेच या नाटकाचे खरे श्रेय अजित लाडला तर आहेच, पण जे सर्व कलाकार होते त्याचे देखील योगदान नाकारुन चालणार नाही. त्यात कधीही दशावतार नाटक न केलेले असताना अगदी प्रोफेशनली भूमिका सादर केलात त्याबद्दल सर्वांचेच खूप अभिनंदन. त्या दिवशीचे सर्व कार्यक्रम पार पडल्यावरती झोपतांना मला समजले की, माझ्या कानातले कर्णफुले हरवले आहेत. तेव्हा खूप वाईट वाटले. गीता माझ्या सोबत होती, तिला सांगितल्यावर ती पण बेचैन झाली. खाली येऊन रात्रीच्या वेळी शोधत बसणे शक्यच नव्हते तरीही दोन वेळा खाली येऊन गेलो. गीता तर रात्रभर वस्तू मिळण्याचे मंत्र म्हणत होती. तर रात्रभर मी स्वामींचे नामस्मरण स्वप्नातही… झोपेतही करत होते.
दशावतार मधील ताम्र सरोवरातील फुलाप्रमाणे मला स्वप्नात माझे कानातले मोती दिसू लागले होते. सकाळी योग वर्ग घ्यायचा होता उठणे तर जरुरी होते. सकाळी उठून पुन्हा खाली शोधण्याची शिकस्त केली पण अशक्य गोष्ट होती. कानातील टॉप्स वाळूत पडले होते ते कोठे पडलेत हे माहीत नव्हते पण म्हणतात ना…मैत्री नावाची एक शक्ती तिथे वावरत होती म्हणूनच मी पूर्ण योगवर्ग व्यवस्थित घेऊ शकले. मनात तेव्हा एकदाही वाटले नाही माझी काहीतरी मौल्यवान वस्तू हरवली आहे. योग वर्ग शिकविताना कधी दोन-तीन तास गेले समजलेच नाही. सर्व मित्र-मैत्रिणी एवढ्या उत्साहात करत होते… ऐकत होते अनुभवत होते आणि मलाही एक ऊर्जा येत होती, न कंटाळता सर्वांनी छान प्रतिसाद दिला धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो.
खरं तर तुम्हा सर्वांचे आरोग्य चांगले रहावे यासाठीच मला तुम्हाला योगा शिकवायचा आहे या उद्देशाने मी आले होते आणि कित्येक वर्षांच्या विरहा नंतर तुम्हा सर्वामध्ये मिसळण्याचा योग आला.तुमच्यापर्यंत मी येऊन पोहोचले आणि सर्व काही निर्विघ्नपणे पार पडले. त्यानंतर नाश्ता करतांना सर्वानाच समजले की माझ्या कानातली मोती कर सुवर्ण कर्णफुले हरवली आहेत. मग जो तो आपले कर्तव्य समजून माझे कानातले शोधू लागले आणि पहिला एक कर्णफुल विदुलाच्या तीक्ष्ण दृष्टीस दिसून आला. मी तर आशा सोडली होती आणि तिने माझ्या हातात ते मोती सुवर्ण कर्णफुल दिल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि थोड्याच वेळाच्या अंतराने मित्र राजेंद्र पारकर याला दुसऱ्या कानातील कर्णफुल मिळाले. मला स्वप्नात तर नाही ना असा भास झाला कारण अशक्यच गोष्ट शक्य झाली होती तेवढ्यात शशीचा कॉल आला साऱ्या मैत्री परिवाराशी तो व्हिडिओ कॉल वरून बोलला. पण मी एवढेच सांगेन ती सुवर्ण कर्णफुले मला मिळाली यामागे मैत्री परिवाराचीच ताकत होती.
त्यानंतर काही वेळात लगोरी, संगीत खुर्ची खेळ झाला. त्यानंतर आपल्या परिवाराची पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी विचार मंथन बैठक पार पडली.यामध्ये अनेक मित्रमैत्रिणींनी खूप चांगल्या सुचना मांडल्या. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. मला मासे अतिशय खूप आवडतात. मनसोक्त पोटभर टम्म जेवलो.अतिशय स्वादिष्ट जेवण बनवले होते. मग शेवटी परतीच्या प्रवासाची वेळ जवळ आली…आता सर्वजण आपापल्या घरी जाणार… पुन्हा मध्ये भेटणार नाही म्हणून खूप मनापासून वाईट वाटत होते… आता घरचे वेध लागले होते… पुन्हा एकदा माझ्या सर्व मैत्रिणींना गीता, वैशाली, विदुला, सरिता, सुरेखा, छाया, रत्ना, ज्योत्स्ना, प्रणिता, वनिता, मीना, प्रफुल्लता, मनिषा, अर्चना यांची गळा भेट घेऊन प्रत्येकाने असेच एकमेकांशी संपर्कात राहायचे कबूल केले. नंतर सर्व मित्रांचा निरोप घेऊन कोणकोणत्या गाडीत बसून जाणार हे कुटुंबप्रमुखांनी ठरवून दिले. येताना अभी पडते तर निघतांना बाळू पाताडे याच्या गाडीत बसून अगदी काळजीपूर्वक आमची रवानगी केली. अतिशय आदरयुक्त आणि मैत्रीपूर्ण वागणूक सर्व मित्रांकडून मिळाली. शशीने आपल्या मित्रांबद्दल दिलेला विश्वास प्रत्यक्षात अनुभवयास मिळाला, त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. अशीच आपली सर्वांची मैत्री कायमस्वरूपी अबाधित रहावी आणि राहिल हा मला विश्वास आहे. कासार्डे येथे पोहोचल्यानंतर दादा मांजरेकर याने तर मला अगदी माझ्या घरापर्यंत आणून सोडले. तो तर नात्याने माझा दीरच लागतो. असे हे अतिशय सुंदर आणि माझ्या आठवणीतील अविस्मरणीय गेट-टुगेदर ठरले.
मुळातच गेट-टुगेदरचा अर्थ म्हणजे त्यात दडलेला योग असा आहे. योग म्हणजे एकमेकांशी जोडणे किंवा एकत्र येणे म्हणजेच योग होय. असा दुर्मिळ योग मला यावेळी माझ्या आयुष्यात अनुभवास आला. योगामध्ये जसे शरीर व मन एकत्र आणावे लागते तसेच मैत्रीमध्ये आपण ह्या गेट-टुगेदरच्या निमित्ताने खूप काही अनुभवले. सर्वच जणांनी शरीराने, मनाने, भावनेने, बौद्धिक पातळीने मैत्री रुपी आनंद उत्साहाने प्रतिसाद दिला. प्रत्येकाची विशेष काळजी घेतली.थट्टा-मस्करी, मार्गदर्शक सुचना, लटका राग, सर्व काही त्या दोन दिवसात अनुभवायला मिळाला. सर्वजण एकाच घरात राहत आहोत असे वाटले. रोजच्या रुटीन मधून बाहेर आल्याने रिफ्रेश होता आले. माझा तर जयरामने तिथेच फीडबॅक पण घेतला होता. गेट-टुगेदर तुला कसे वाटले? जशी मी एक सेलिब्रिटी आहे की काय असे फील झाले? त्यावेळी मी तर म्हणेन गेट-टुगेदरला येणे म्हणजे प्रत्येकाचे आद्य कर्तव्यच आहे. आता जाता जाता एकच सांगते माझ्या ज्या मैत्रिणी येऊ शकल्या नाहीत. त्यांची या नात्या कारणाने खूप आठवण आली. राणी, समिता, वैशाली, विजयश्री, दिना, सुजाता, साधना पुढच्या वेळी सर्वांनी येणे गरजेचे आहे आणि निश्चित याल याची मला खात्री आहे. सर्व मित्रांचे पण खूप सहकार्य लाभले. हा मैत्री परिवाराचा मैत्री रुपी वटवृक्ष सदा हिरवागार…बहरत राहो…फुलत राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. या लिखाणात काही चुका झाल्या असतील तर मला मोठ्या मनाने माफ कराल ही खात्री आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.