सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कामांच्या चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा

मालवण,दि.५ फेब्रुवारी

मालवणात नौसेना दिननिमित्त झालेल्याकामांसंदर्भात, कणकवली रेल्वे स्थानक परिसरात होणारे रस्ते सुशोभीकरण कामांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, कणकवली यांची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांच्या पद नियुक्तीनंतर सिंधुदुर्गात झालेल्या अन्य कामांची व रस्त्यांच्या कामांची स्टफवेल सारख्या यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी. त्याचा अहवाल वरिष्ठांना द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद सांडव, प्रसाद गावडे, दीपक गावडे, अमित इब्रामपूरकर व इतरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग परिमंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून या मागण्यांसाठी दि. १५ फेब्रुवारीला अधीक्षक अभियंता चर्चेला येईपर्यंत कणकवली येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते विनोद सांडव, प्रसाद गावडे, दीपक गावडे, बाबल गावडे, राजेश टंगसाळी, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, आप्पा मांजरेकर, आशीष सुभेदार, मंदार नाईक, संदीप लाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग परिमंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदन सादर करत कार्यकारी अभियंता यांच्या कामांच्या चौकशीची मागणी केली आहे.

कार्यकारी अभियंता हे कणकवली कार्यालयात ग्रामस्थ, सरपंच तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांना भेटीसाठी उपलब्ध होत नाहीत. कोणत्याही रस्त्याचे आधी कामे नंतर निविदा बनवल्यामुळे कामे निकृष्ट होत आहेत. सर्वच रस्त्यांना खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामे जादा दराने करून ठराविक ठेकेदारांना दिली जातात. अंदाजपत्रके देखील वाढवली जातात. अश्याप्रक्रारची कामे नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने मालवणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागच्या वतीने घाई गडबडीत उरकण्यात आली होती. यात हेलिपॅड व त्याला जोडणारे रस्ते तसेच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी चौथरा व राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण यांचा समावेश आहे. सदरील कामात भ्रष्टाचार व अपहार झाला आहे, असा आरोप या निवेदनातून विनोद सांडव व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

सदर कामाच्या अंदाजपत्रकात व प्रत्यक्ष केल्या कामात तफावत आढळून येत असून शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचे आम्हाला जाणवत आहे. मालवण मधील नागरिक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने नौसेना दिनानिमित्त मालवण मध्ये झालेल्या कामांच्या माहितीसाठी कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे कामांसंदर्भात माहितीची मागणी केली असता त्यांनी माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. त्यांचा प्रशासकीय कारभार संशयास्पद वाटत आहे, त्यामुळे त्यांच्या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.