भंडारी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रो-कबड्डी स्पर्धा संपन्न

मालवण,दि.१६ डिसेंबर 

मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असून यानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रो-कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुलांच्या गटात बहिर्जी नाईक संघाने छत्रपती संभाजी महाराज संघाला पराभूत करून विजेतेपद मिळविले. तर मुलींच्या गटात झाशीची राणी संघाने आई जिजाऊ संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गांनुसार कॉलेजचा सुवर्णमहोत्सवी लोगो असलेली टी-शर्ट परिधान केली होती. या स्पर्धेत मुलगे व मुली यांचे मिळून अकरा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उदघाटन संस्था पदाधिकारी दशरथ कवटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर बक्षीस वितरण मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पंच म्हणून कबड्डी प्रशिक्षक श्री. साळुंखे, विनिता साठे व सहकाऱ्यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी वामन खोत, दशरथ कवटकर, प्रा. पवन बांदेकर, माजी विद्यार्थी भूषण मेतर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेस प्राचार्य हणमंत तिवले, माजी विद्यार्थी हेमंत शिरगांवकर, सौ. मिलन सावजी, ऍड.पलाश चव्हाण, चेतन आजगावकर, सागर जाधव, भार्गव खराडे, प्रभुदास आजगावकर, ओंकार यादव, सर्वेश बागवे, सोहम कांबळी यांच्यासह शिक्षक गुरूदास दळवी, गणेश सावंत, वैभवी वाक्कर, मनीषा इंगळे, अजित परुळेकर, कोचरेकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी नंदकिशोर मळेकर, विलास वळंजू, श्री. पालव आदी व इतर उपस्थित होते.