सावंतवाडी दि.१६ डिसेंबर
सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील भटवाडी आणि लगतच्या परिसरात माकडांचा उपद्रव अलिकडे फारच वाढला आहे आणि त्यामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणावर होत आहे. वन विभागामार्फत माकड पकडून दूर सोडण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेद्वारे सदर माकडांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्याकडे माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी केली.
याबाबत निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे,माकडांच्या झुंडी आजुबाजूच्या जंगलात ठाण मांडून आहेत. माकडांच्या एका झुंडीत सुमारे १० ते १५ किंवा त्याहूनही जास्त माकडे असतात. आठवडयातून अनेकवेळा विविध ठिकाणी माकडे वस्तीत आक्रमण करतात. अलिकडच्या काही दिवसांत सावंतवाडी शहरात इतरत्रही माकडांचा मुक्त संचार वाढला असून त्यामुळे घराच्या कौलांचे, पत्र्यांचे, तसेच केळी, नारळ, पपई व अन्य फळांचे अतोनात नुकसान होत आहे. गोरगरिबांच्या परसबागांमध्ये माकड धुडगूस घालत असल्याने फारच नुकसान होत असून माकडांच्या त्रासास रहीवाशी खूप कंटाळले आहेत.
सावंतवाडी शहरातील भटवाडी, तसेच इतरत्र परिसरात धुडगूस घालणा-या उपद्रवकारी माकडांना पकडून दूर सोडण्यात यावे. या करितां आवश्यकती कार्यवाही त्वरीत करण्यात यावी.भटवाडी बाहेरचा वाडा व संपूर्ण सावंतवाडी मध्ये माकडांचा त्रास आहे त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी भाजप माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मेघना साळगांवकर ,मेघना भोगटे, अन्वी मेस्त्री ,ज्योती मुद्राळे आदींनी केली आहे.