“आभाळमाया” ग्रुपने सलग चौथ्या वर्षी गाठला २०० रक्तदात्यांचा टप्पा.

२३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान;वराडकर हायस्कूल कट्टा येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

आभाळमाया ग्रुप व जी एच फिटनेस कट्टा यांच्या वतीने आयोजन

कुडाळ ,दि.१६ डिसेंबर

सहकार महर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने वराडकर हायस्कूल कट्टा येथे रविवार, १५ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात २३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
दरम्यान, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक संजय गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आभाळमाया ग्रुपचे सर्वेसर्वा राकेश डगरे, जी. एच. फिटनेस कट्टाचे गौरव हिर्लेकर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, डॉ. सोमनाथ परब, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, ट्रस्टच्या सचिव मनीषा साळगावकर, रेखा डीचोलकर, अध्यक्ष राजश्री उर्फ बेबी डगरे, माजी मुख्याध्यापक अनिल फणसेकर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्हाध्यक्षा मानसी परब, स्मिता कंप्यूटर इंस्टिट्यूटच्या संचालिका श्रद्धा नाईक, राणी डगरे, दिया ढोलम, वराड सरपंच शलाका रावले, वराड उपसरपंच गोपाळ परब, भाजप वराड केंद्र प्रमुख राजन माणगावकर, नवी मुंबई महानगरपालिकेचे जयंत जावडेकर, समाजसेवक विष्णू लाड, वराड गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अमित उर्फ छोटू ढोलम, कट्टा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील गुराम, कला शिक्षक समीर चांदरकर, उद्योजक समीर रावले, उद्योजक प्रवीण मिठबावकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जगन चव्हाण, पोलिस नाईक नितीन शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना संजय गावडे यांनी असे सांगितले की “अन्नदान आणि रक्तदानासारखे श्रेष्ठदान दुसरे कुठचे नाही. आभाळमाया ग्रुप प्रथम वाडी नंतर गाव नंतर जिल्हा आणि आता महाराष्ट्रभर आपलं कार्य करत आहे.
तर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी राकेश डगरे आणि आभाळमाया ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक करून स्वतः आभाळमाया ग्रुपचे सदस्य असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
आभाळमाया ग्रुपच्या रक्तदान शिबिरास सकाळपासूनच अनेक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी हजेरी लावली आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. आभाळमाया ग्रुपच्या या रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी रक्तदान शिबिर उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांच्यासोबत वराड गावचे सुपुत्र उद्योजक बाळा चिंदरकर, माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर, मिठबावचे माजी सरपंच भाई नरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, सामाजिक कार्यकर्ते दीपा सावंत, पेंडूर उपसरपंच सुमित सावंत, देवगड पी. एस. आय. अण्णा दरवेश, मनोहर मयेकर, कुणकावळे सरपंच मंदार वराडकर, विनोद सांडव, अर्जुन चिंदरकर हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना बाळाचे चिंदरकर यांनी असे प्रतिपादन केले की “आभाळमाया ग्रुप जिल्ह्यात सामाजिक सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहे. वराड गावचे भूषण सहकार महर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदानासारखे कार्य करून आभाळमाया ग्रुपचे सर्वेसर्वा राकेश डगरे आणि त्यांचे सहकारी कै. डी. बी. ढोलम यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ”
यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शुभेच्छा देताना सांगितले की कै. डी. बी. ढोलम सरांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार रुजवला अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. ढोलम सरांनी समाजकार्याचा घालून दिलेला आदर्श आभाळमाया ग्रुप पुढे चालवतोय याचा अभिमान वाटतो.”
यावेळी आभाळमाया ग्रुपच्या वतीने श्री भाई नरे यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच तब्बल ५७ वेळा रक्तदान करणारे शेखर मसुरकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर कुडाळ-मालवण विधानसभेचे माजी आमदार वैभव नाईक यांनीही रक्तदान शिबिरास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक मंदार केणी, उद्योजक बिजेंद्र गावडे, विश्वजीत चिंदरकर, ओमकार येरम हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना वैभव नाईक यांनी असे प्रतिपादन केले की, रक्तदानाच्या माध्यमातून तरुण मुलांना चांगल्या सवयीकडे आपण नेत आहात. आभाळमाया ग्रुप सातत्याने दरवर्षी हा उपक्रम घेतात त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आहे” असे सांगून आभाळमाया ग्रुपच्या या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.

याबरोबरच एन. डी.आर.एफ. टीमचे निरीक्षक राजू प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एनडीआरएफच्या जवानांनीही या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान केले.
तब्बल २३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून यशस्वी केलेले हे रक्तदान शिबिर सुरळीत पार पडण्यासाठी आभाळमाया ग्रुपचे सर्व सदस्य, वराडकर हायस्कूल कट्टाचे सर्व शिक्षक, ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक, इंग्लिश मीडियम चे शिक्षक, सीनियर कॉलेजचे प्राचार्य आणि सहकारी प्राध्यापक, एनसीसीचे पथक प्रमुख श्री राऊळ सर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच जीवनधारा रक्तपेढी कोल्हापूर, जिल्हा रुग्णालय ओरोस रक्तपेढी, आणि एस. एस. पी. एम. हॉस्पिटल पडवे रक्तपेढी, ग्रामविकास मंडळ कावळेवाडी, वराडकर हायस्कूल माजी विद्यार्थी संघ यांचेही सहकार्य लाभले. तसेच स्मिता कम्प्युटर एज्युकेशन कट्टा आणि संपूर्ण टीमचे विशेष सहकार्य लाभले.
या रक्तदान शिबिरा निमित्त अमित चव्हाण यांनी उभारलेला सेल्फी पॉइंट आणि वराडकर हायस्कूल कट्टा कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी साकारलेला रक्तदान शुभंकर हे आकर्षणाचे केंद्र ठरले. या रक्तदान शुभंकराने रक्तदात्यांमध्ये उत्साह वाढवला. तसेच आभाळमाया ग्रुपच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर सौ. वीणा शिरोडकर मॅडम यांनी बनवलेली चित्रफीत ही लक्ष वेधून घेत होती, एनसीसी चे विद्यार्थी यांनीही कार्यक्रमाला शोभा आणली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंद्रथ परब यांनी केले.