बांदा,दि.१७ डिसेंबर
अवेळी पडलेल्या पावसामुळे हवामानातील अनियमिततेचा फटका शेतकरी बागायतदारांना बसतो. बऱ्याच वेळा महसूल मंडळ कार्यालयांकडे पर्जन्यमापक, तापमानमापक व वायूमापक यंत्रात समस्या असल्यामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे सदर यंत्रांची डागडुजी वेळोवेळी करावी अशी मागणी, सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अनेक समस्यांकडे संघटनेने तहसीलदारांचे लक्ष वेधले. यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, प्रगतशील शेतकरी दिवाकर मावळणकर, एड. वैभव देसाई आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, सावंतवाडी-दोडामार्ग शेतकरी संघटनेच्या वतीने 2019 मध्ये सदर मागणी करण्यात आली होती. जिथे ग्रामपंचायत तिथे हवामान मापक यंत्रे प्रत्येक महसुली गावात बसवण्याकडे लक्ष वेधले होते. सद्यस्थितीत अवेळी पडणारा पाऊस भात शेतीसह फळपिकांनाही नुकसानकारक ठरत आहे. हवामानातील अनियमितता यामुळे भात शेती, आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम या व अशा प्रकारचे अन्य पिकांचे नुकसान होते. शासनाकडून विम्यासाठी आंबा व काजू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अन्य पिके विमा कक्षेत समाविष्ट करून घ्यावी अशी मागणी फळबागायतदार संघाने केली आहे.
महसूल यंत्रणेमार्फत महसूल मंडळ कार्यालयांकडे पर्जन्यमान तापमान व वायूमापक यंत्रे बसवलेली आहेत. बऱ्याच वेळा तांत्रिक अडचणीमुळे तापमान आणि वायू यांच्या नोंदणी सदरच्या यंत्रामध्ये होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागते. तसेच 1 ते 10 डिसेंबर पर्यंत पडलेल्या पावसाचा अहवाल आम्हाला मिळावा अशी मागणी विलास सावंत यांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे केली.
दरम्यान, सर्व मागण्यांबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सकारात्मकता दाखविल्याचे विलास सावंत यांनी सांगितले.
Home आपलं सिंधुदुर्ग हवामान यंत्रातील तांत्रिक समस्या सोडवा – सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेची तहसीलदारांकडे मागणी :...