सावंतवाडी, दि. १७ डिसेंबर
तळवणे मठवाडी येथे आरोंदा सावंतवाडी मुख्य रस्त्याला भगदाड पडल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. सदर रस्त्याचा बाजूने तिलारीचे पाणी शिरोडा, वेंगुर्ले येथे नेण्यासाठी भूमिगत जलवाहिनी घातलेली आहे. मात्र, त्यावेळी खणलेला रस्ता पूर्ववत बुजविलेला नाही. त्यामुळे पावसात येथे असलेली मोरी वजा पूल खचल्याने त्याठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे.
आरोंदा तळवणे सावंतवाडी हा राज्यमार्ग आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. एकाचवेळी दोन वाहने पास होताना वाहन सदर खड्यात जाऊन मोठा अपघात घडण्याचा धोका आहे. त्यामुळे या भागातून ये-जा करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागते. रात्रीच्या वेळीही या रस्त्यावर वाहतूक सुरूच असते. अशावेळी हा खड्डा वाहन चालकाच्या दृष्टीस पडत नाही. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. तळवणे ग्रामपंचायतीने तसेच सर्वाजिक बांधकाम खात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन सदर खड्डा बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक सदानंद गावडे यांनी केली आहे.