सावंतवाडी, दि. १७ डिसेंबर
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी आणखी एका भूलतज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसुती, सिझर व अन्य आजारांवरील शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे रुग्णालयात कार्यरत असलेल्या एकाच भूलतज्ज्ञ डॉक्टरवर होणारा अतिरिक्त कामाचा ताण कमी होऊन रुग्णांना सेवा मिळणार आहे.
यासाठी सावंतवाडी येथील जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी ही बाब कोल्हापूर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्या निदर्शनास आणून दिली. रुग्णालयासाठी दोन भूलतज्ज्ञ डॉक्टरांची गरज असल्याचे सांगितले.
गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी, भूलतज्ज्ञाअभावी होणारा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास होऊ नये, यासाठी भूलतज्ज्ञ नियुक्तीची मागणी मसुरकर यांनी उपसंचालकांच्याकडे चार दिवसांपूर्वी केली होती. त्याची दखल घेत उपसंचालकांच्या आदेशान्वये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी जादा भूलतज्ज म्हणून डॉ. तेजस्विनी आवळे यांची नियुक्ती केली आहे. डॉ. आवळे या आठवड्यातील सोमवार, मंगळवार वा बुधवार हे तीन दिवस रुग्णसेवेसाठी कार्यरत राहणार आहेत