महोत्सवाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार ; हिंदी , मराठी सिने कलाकार कणकवलीकरांच्या मनोरंजनासाठी अवतरणार
कणकवली, दि. १७ डिसेंबर
कणकवली नगरपंचायतची निवडणूक झाली नसल्यामुळे आमची सत्ता नसली तरी , जनतेला ‘देवू तो शब्द पूर्ण करु’ या ब्रिदाप्रमाणे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली पर्यटन महोत्सव २०२५ चे आयोजन करीत आहोत.९ ते १२ जानेवारी या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.महोत्सवाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात हिंदी , मराठी सिने कलाकार कणकवलीकरांच्या मनोरंजनासाठी येणार असल्याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली येथील भाजपा शहर कार्यालय येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे , माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , राजा पाटकर,नवराज झेमणे आदी उपस्थित होते.
समीर नलावडे म्हणाले ,९ जानेवारीला भव्य शोभा यात्रा व चित्ररथ सायंकाळी ४ वाजता श्री पटकीदेवी मंदिर ढालकाठी मार्गे , बाजारपेठेतून मुख्य चौक ते कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील महोत्सव स्थळापर्यंत निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता फूड फेस्टिवलचे उद्घाटन होणार आहे. या पर्यटन महोत्सावाचे उद्घाटन मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रात्री ९ वाजता होणार आहे. त्यानंतर जल्लोष कार्यक्रम होईल , त्यात चला हवा येवू द्या फेम भाऊ कदम , कुशल बद्रीके व अन्य कलाकार धमाल कॉमेडीचा शो आणि ऑकेस्ट्रा असा कर्यक्रम होणार आहे. तसेच कणकवली शहरातील १५ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
१० जानेवारीला आम्ही कणकवलीकर तसेच कणकवली शहरातील २५० नामवंत कलाकारांचा संगीत , नृत्य व कॉमेडी असा कार्यक्रम ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर,संजय मालंडकर, प्रा. हरीभाऊ भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ७ वाजता होणार आहे.११ जानेवारीला बेधूंद म्युझिकल नाईट सायंकाळी ८ वाजता होईल. त्यासाठी इंडीयन आयडॉल सायली कांबळे व अन्य तीन नामवंत गायक कलाकार येणार आहेत.
त्यानंतर १२ जानेवारी रोजी महोत्सवाचा समारोप माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे , निलमताई राणे,कॅबिनेट मंत्री नितेश राणे , आमदार निलेश राणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रात्री ९ वाजता होणार आहे. त्यानंतर भव्य ‘ संगीत रजनी’ कार्यक्रम होईल. त्यासाठी सुप्रसिध्द गायक ऋषी सिंग यासह नामवंत कलाकार कणकवलीत येणार आहेत, अशी माहिती समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली शहरातील नागरीकांसाठी पर्यटन महोत्सवावर आधारीत इन्टाग्राम रिल्स २०२५ चे आयोजन करण्यात आले आहेत. या स्पर्धेत कला, क्रिडा, सांस्कृतिक , व खाद्यसंस्कृती आधारावर रिल्स १ मिनिटांची असावी. कणकवली शहरातील स्पर्धकांनी १ ते ७ जानेवारी या कालावधीत या रिल्स आमच्याकडे पाठवायच्या आहेत. तसेच फूड फेस्टिवल अंतर्गत स्टॉल उभारले जाणार आहेत,बुकिंग माजी नगरसेवक संजय कामतेकर यांच्याकडे करावेत. ८० स्टॉल असणार आहेत , असेही समीर नलावडे यांनी सांगितले.