काँग्रेसच्यावतीने कणकवली प्रांताधिकाऱ्याना निवेदन
कणकवली,दि.१७ डिसेंबर
परभणी येथे संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिकृतीची तोडफोड करणा-या माथेफिरुवर, त्याला पाठीशी घालणा-यांवर तसेच संविधानाच्या रक्षणकर्त्यांचे पोलिस कोठडीत बळी घेणा-या व्यवस्थेवर कठोरात कठोर कारवाई शासनाने करावी,अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना देण्यासाठी निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्याकडे काँग्रेस शिष्टमंडळाने सुपूर्द केले.
या निवेदनात म्हटले आहे की,भारतीय लोकशाही ही जगात सर्वात मोठी लोकशाही गणली जाते. भारतीय संविधानाला लिखित स्वरुपात, विस्तृत व सर्वसमावेशक म्हणून जगामध्ये स्थान आहे. गेल्या काही वर्षामध्ये समाजातील काही घटकांकडून जाणीवपूर्वक संविधानाबद्दल चुकीची व खोटी वक्तव्ये केली जात आहेत. परभणी येथे काही दिवसांपूर्वी संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिकृतीची तोडफोड व विटंबना करण्यात आली. त्यानंतर प्रतिक्रिया म्हणून निषेध नोंदविण्याकरीता नागरिक रस्त्यावर उतरले. त्या जमावातील निषेधकर्त्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या संविधानवादी तरुणाचा पोलिस कोठडीत बळी गेला. वरील घटनेमध्ये संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिकृतीची तोडफोड करणा-या माथेफिरुवर, त्याला पाठीशी घालणा-यांवर तसेच संविधानाच्या रक्षणकर्त्यांचे पोलिस कोठडीत बळी घेणा-या व्यवस्थेवर कठोरात कठोर कारवाई व्हावी.असेही या निवेदनात म्हटले आहे.
प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, बाळू मेस्त्री, प्रवीण वरूणकर,संजय राणे,व्ही.के.सावंत,अजय मोरये आदी उपस्थित होते.
फोटो ओळ- कणकवली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्याकडे काँग्रेसच्या वतीने निवेदन सुपूर्द करण्यात आले.यावेळी प्रदीप मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.