मालवण,दि.५ फेब्रुवारी
मालवण तालुक्यातील हडी येथील बर्फ फॅक्टरीत काम करताना जनरेटर बंद करण्यास गेलेल्या रोशन लाल (मूळ रा. उत्तरप्रदेश) या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडी येथील बर्फ फॅक्टरीत तिघे कामगार काम करीत असताना सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्यांनी जनरेटर सुरु करून त्यावर बर्फ काढणे, क्रश करणे आदी काम सुरु केले. त्यानंतर काही वेळाने वीज पुरवठा सुरु झाल्याने रोशन लाल हा जनरेटर बंद करण्यासाठी गेला. मात्र तो बराच वेळ न परतल्याने त्याला बघण्यासाठी दुसरा कामगार गेला असता त्यास रोशन लाल हा विजेच्या धक्क्याने जमिनीवर कोसळलेला दिसून आला. यावेळी जनरेटर बंद करून रोशन लाल याला उठविण्याचा प्रयत्न केला असता त्याची हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रोशन लाल हा मयत असल्याचे सांगितले. याबाबत रोशन लाल याच्या भावाने मालवण पोलीस स्थानकात खबर दिली असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हेमंत पेडणेकर आणि सुशांत पवार हे करीत आहेत.