कुडाळ शहर लवकरच होणार मच्छरमुक्त !

कुडाळ नगरपंचायतीचे आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती

कुडाळ,दि.१७ डिसेंबर
कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी तब्बल ४० हजार गप्पी माशांची तरतूद करण्यात आल्याची माहिती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना मंदार शिरसाट म्हणाले की, कुडाळ शहरात आरोग्य सेवा सुरळीत होणे आवश्यक आहे.
कुडाळ शहरांमध्ये मच्छरांचे प्रमाण गेल्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मच्छरमुक्त कुडाळ हे अभियान राबविण्यात येईल. त्या अंतर्गत कुडाळमध्ये जिथे मच्छर उत्पत्ती होत असलेले पाण्याची स्रोत असतील हे नगरपंचायतीच्या माध्यमातून निश्चित करण्यात येतील. येणाऱ्या नवीन वर्षात शहरांमध्ये ४० हजार गप्पी मासे शहरांमध्ये ड्रेनेजच्या पाण्यामध्ये सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी नगरपालिकेमध्ये गप्पी मासे पैदास केंद्र असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या ८ जानेवारी २०२५ रोजी याचा पहिला टप्पा म्हणून कुडाळ शहरांमध्ये १ हजार गप्पी मासे सोडण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फेब्रुवारीमध्ये १ हजार गप्पी मासे आणि मार्चपासून सर्व सोसायटी आणि ज्या ठिकाणी मच्छर असेल त्या कुडाळ शहरातील नागरिकांना गप्पी मासे आमच्या पैदास केंद्रामधून एक दिवस ठरवून मोफत स्वरूपात दिले जाणार आहेत. या अभियानातून कुडाळ शहरातील मच्छर हे पूर्णपणे संपवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांनी सांगितले.