आचरा,दि.१७ डिसेंबर (अर्जुन बापर्डेकर)
थंडीचा जोर वाढलाय मात्र राहुट्यात विसावलेल्या आचरेवासियांना गप्पांच्या रंगात ना थंडी ना जागरण ना कशाचा त्रास एकत्र जेवण एकत्र राहणे यातून सहजीवनाचा आनंद घेत आचरा वासिय रमलेत गावपळणीच्या आनंदात
हल्लीधावपळीच्या आणि मोबाईल युगात कुटूंबातील संवाद हरवत चाललेत तर शेजारयांशी गप्पा कुठल्या? मात्र आचरा गावपळणीमुळे वेशीबाहेर रानावनात झोपड्या उभारुन एकत्र राहणाऱ्या ग्रामस्थांकडे मोकळा वेळ भरपूर असल्याने हरवलेले संवाद पुन्हा जुळले आहेत.भजने फुगड्या,गोमू नाच,वारकरी दिंड्या यात रंगून गेलेल्या ग्रामस्थांनी रविवार पहिल्या दिवशी ताव मात्र चिकन, माशांवर मारला आहे.मात्र पुढील दिवस शाकाहारी आहारातच गेले.
रविवार दुपार नंतर आचरा गावची गावपळण सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्याकडे धाव घेतली होती. पहिला दिवस आवरा आवर आणि स्वयंपाकात गेल्याने इतर वेळी काम धंद्याच्या धावपळीत गाठभेट ही दुर्मिळ झालेल्या आचरा वासियांनी सोमवारी, मंगळवारी एकत्र बसून गप्पा मारण्यात वेळ घालवत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे राहूट्यांबाहेर गप्पांचे फड जमलेले दिसून येत होते. तर महिला मंडळी सामूहिक जेवणाच्या तयारीत रमलेल्या दिसून येत होत्या. ग्रामस्थही धम्माल मस्तीत गावपळणीचा आनंद लुटत आहेत. वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी वरचीवाडी ग्रामस्थांसोबत स्वरचित काव्य गायनाचा आनंद लुटला.
याबाबत चिंदर त्रिंबकच्या वेशीवर राहुट्या उभारुन राहिलेले डोंगरे ग्रामस्थ नाथा परब,दाजी सावंत
सांगतात आम्ही सर्व चौदा,पंधरा कुटूंबे या गावपळणीनिमित्त एकत्रच राहत असून सर्व एकत्र जेवण करून गावपळणीचा आनंद लूटत आहोत. डोंगरे वाडी येथील तरुण पीढीची प्रतिनिधी विदिशा सावंत सांगते आम्ही खुप आनंदोत्सव साजरा करतो.येथे वाडीतील एकाच्या लग्नाचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा केला. मुंबई वरुन गावपळणीवर टेलीफिल्म बनविण्यासाठी आलेले नंदू आचरेकर, सुनित आचरेकर
सांगतात आम्ही गावपळणीबाबत ऐकून होतो .पण कामाच्या व्यापात सहभागी होता येत नव्हते. पण यावर्षी आम्ही सहभागी झालो असून येथे सर्व एकत्र मिळून राहण्याचा आनंद पैसे देवून पिकनिकला जावूनहि मिळणार नाही असा आहे. येथील झोपड्यात सर्व मिळून मिसळून राहण्याचा आनंद मुंबईच्या सुखवस्तू घरालाही येणार नसल्याचे सांगतात. एकंदरीत रविवार,सोमवारी रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडी लाही न जुमानता आचरा वासिय मजेत गावपळणीचा आनंद लुटत आहेत.
वेशीबाहेर ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
ग्रामस्थ बाहेर गेल्यामुळे लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कपिल मेस्त्री यांच्या पुढाकाराने
प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा आणि न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन प्रा लि बेंगलोर टेलिमेडीसीन सुविधा केंद्रामार्फत पारवाडी नदिकिनारी वेशीबाहेर राहिलेल्या ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळीत्यांना क्षय कृष्ठ आदी रोगांबद्धल माहिती देवून जागृती करण्यात आली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक हेमंत सावजी, गणेश यादव, आरोग्य सेविका विद्या इंगवले,शीतल गोळवणकर, तेजश्री राउळ,आचरा ग्रामपंचायत सदस्य चंदू कदम आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.तर चिंदर भगवंतगड रोडलगत वास्तव्यास ग्रामस्थांची मंगळवारी आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी डॉ कपिल मेस्त्री,
उपसरपंच संतोष मिराशी,ग्रामपंचायत सदस्य किशोरी आचरेकर पंकज आचरेकर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वामन आचरेकर,हॉस्पिटल चे कर्मचारी आणि सर्व बाळगोपाळ मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.